T20 World Cup 2022 Ind vs Eng semifinal : भारत आज भिडणार इंग्लंडशी

T20 World Cup 2022 Ind vs Eng semifinal : भारत आज भिडणार इंग्लंडशी
Published on
Updated on

थेट ऑस्ट्रेलियातून

  • निमिष पाटगावकर

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसर्‍या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी अ‍ॅडलेड तयार आहे. बुधवारी इथे 29 डिग्री सेल्सियस तापमान होते आणि घाम येईपर्यंत उकडत होते. आकाशातील ओझोन थराच्या कमीपणामुळे इथे ऊन जास्तच भाजते. भारतीय संघाने दुपारी कसून सराव केला. त्याआधी कर्णधार रोहित शर्माच्या पत्रकार परिषदेत त्याच्या हाताला झालेली दुखापत गंभीर नसल्याने तो फिट आहे हे त्याने सांगितले. संघ रचनेबाबत मात्र ऋषभ पंत का कार्तिक याचे उत्तर अपेक्षेप्रमाणे गुलदस्त्यातच ठेवणे पसंत केले. सराव सत्रात दिनेश कार्तिक आणि अक्षर पटेल दोघेही फलंदाजीचा सराव करताना दिसले. आपण हा सामना खेळायला मेलबर्नहून इथे आलो आहोत तर इंग्लंड सिडनीहून इथे आले आहे. ऑस्ट्रेलियात प्रत्येक मैदान आणि त्याच्या सीमारेषांची अंतरे वेगळी असल्याने फलंदाजांना त्यांच्या फटक्याची निवड करणे गरजेचे असते. (T20 World Cup 2022 Ind vs Eng semifinal)

पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवच्या फलंदाजीबाबत बोलताना रोहित शर्मा म्हणाला, सूर्याला लहान मैदाने आवडत नाहीत. मोठ्या मैदानात त्याला क्षेत्ररक्षकांमध्ये फटके खेळायच्या जागा दिसतात. मेलबर्नला हे शक्य होते, पण अ‍ॅडलेडला जी खेळपट्टी या सामन्याला वापरणार आहेत तिथून स्क्वेअरच्या सीमारेषा जेमतेम 60-65 मीटर असेल तर समोरची सीमारेषा 80 मीटर असेल. या मैदानात जलदगती गोलंदाजांनी आतापर्यंत या विश्वचषकात तब्ब्ल 56 बळी घेतले आहेत तर फिरकीपटूंनी 20 बळी घेतले आहेत. भारताच्या गोलंदाजीच्या ताफ्यात भुवनेश्वर, अर्शदीप, शमी आणि पंड्या असतील. या विश्वचषकात पंड्या उत्तम गोलंदाजी करत आहे तेव्हा तो पूर्ण चार षटके टाकणार असेल तर भारताने अक्षर पटेल आणि अश्विनपैकी एकाच्या ऐवजी दिनेश कार्तिक आणि पंत दोघांना खेळवले पाहिजे. सातवा फलंदाज म्हणून आज आपण अक्षर पटेलकडे बघत आहोत. कारण एखाद्या गोलंदाजाचा दिवस खराब असेल तर आपल्याला पर्याय राहतो, पण या विचारसरणीतून बाहेर पडून इंग्लंडविरुद्ध फलंदाजी बळकट करण्यावर भर दिला पाहिजे.

या विश्वचषकात आपण संथ सुरुवातीत नेदरलँडच्याही मागे आहोत. पॉवर प्लेमध्ये आपण 6 पेक्षा कमी सरासरीने धावा काढल्या आहेत. भारताने शेवटच्या षटकात फटकेबाजीने ही कसर भरून काढली आहे. निव्वळ याचसाठी एक जादाचा फलंदाज भारताला गरजेचा आहे. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात 184 धावाही लिट्टन दासच्या खेळपट्टीच्या दोन्ही स्क्वेअरच्या बाजूच्या जवळच्या सीमारेषेच्या बाजूच्या फटकेबाजीने कमी वाटायला लागल्या होत्या. इंग्लंड या विश्वचषकात अजून अ‍ॅडलेडला सामना खेळलेला नाही. वूड, स्टोक्स, करन आणि वोक्स या इंग्लिश जलदगती चमूची गोलंदाजीची लेंग्थ इथे महत्त्वाची ठरते. या मैदानावर जलदगती गोलंदाजांनी जास्त बळी मिळवले असले तरी जलदगती गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट इथे जास्त म्हणजे 7.67 आहे. मार्क वूडने या स्पर्धेत सर्वाधिक म्हणजे 31 चेंडू 150 कि.मी.च्या वेगाने टाकले आहेत, पण जर का इंग्लिश गोलंदाजांचा वेगावर भर असला तर लेंग्थमधील जराशी चूकही धावांची पर्वणी ठरू शकते. इंग्लंडला या विश्वचषकात फलंदाजीची संधी पावसामुळे पुरेशी मिळालेली नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्धचा सामना वाहून गेला, आयर्लंडविरुद्ध14 षटकेच फलंदाजी झाली. विश्वचषकात सर्वाधिक धावा करणार्‍या फलंदाजांच्या यादीत कोहली पहिला (246 धावा), सूर्या (225 धावा) तिसरा आहे तर या यादीत इंग्लंडचा पहिला फलंदाज दिसतो तो अलेक्स हेल्स. 4 सामन्यांत फक्त 125 धावा करून 23 व्या स्थानावर आहे. तर बटलर 4 सामन्यांत 119 धावा काढून 28 व्या स्थानावर आहे. डेव्हिड मलानच्या फिटनेसबद्दल आज सकाळी कळेल. इंग्लंडची मुख्य मदार जरी बटलर-हेल्स जोडीवर असली तरी स्टोक्स, करन, मोईन अली हे मधल्या फळीतील चांगले शिलेदार आहेत. इंग्लंड आणि भारत दोन्ही संघ समतोल आहेत तेव्हा हा सामना जसा वूड आणि कंपनी विरुद्ध प्रामुख्याने कोहली आणि सूर्या यांच्यात असेल तसाच भारतीय जलदगती गोलंदाज विरुद्ध बटलर आणि हेल्स यांच्यात आहे. कोहलीचे हे घरापासून दूर असलेले घर आहे. सूर्यकुमार यादवने त्याची फटकेबाजी उपांत्य सामना म्हणून न राखता मुक्तपणे केली पाहिजे.

2019 च्या विश्वचषक अंतिम सामन्यात जोश बटलर इतक्या मोठ्या सामन्यात स्कूप खेळावा की नाही संभ्रमात होता. कर्णधार मॉर्गनने त्याला अंतिम सामन्यात आपला खेळ जराही न बदलता आहे तसा ठेवायला सांगितले. बटलर आणि स्टोक्सच्या भागीदारीने इंग्लंडसाठी इतिहास घडला. भारतीय संघात ऋषभ पंतला स्थान असेल असे वाटते कारण त्याचा इंग्लंडविरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. तो आदिल राशिदला उत्तम खेळतो आणि स्क्वेअर ऑफ द विकेट म्हणतात ते फटके उत्तम खेळतो. जर तो संघात असला तर त्यानेही सूर्यासारखे आपला खेळ न बदलता मुक्त फटकेबाजीचे तंत्र राखले पाहिजे. या विश्वचषकाने टी-20 क्रिकेटमध्ये केवळ 10 चेंडू सामन्याचे भवितव्य बदलू शकतात हे सिद्ध केले. स्पर्धेबाहेर जायच्या बेतात असलेल्या पाकिस्तानने स्पर्धेतील आतापर्यंतच्या सर्वात कमी धक्के घेतलेल्या न्यूझीलंडला मोठा धक्का देऊन अंतिम फेरी गाठली. अ‍ॅडलेडलाही निळा समुद्र आहे, पण आज अ‍ॅॅडलेड ओव्हलवर निळ्या जर्सीतल्या पाठीराख्यांचा समुद्र अवतरेल. आजची लढत जिंकून भारत-पाकिस्तान या टी-20 विश्वचषकाच्या पहिल्या फायनलची पुनरावृत्ती मेलबर्नच्या सुपर फायनलमध्ये करण्याचे मनसुबे भारतीय आताच रचायला लागले आहेत.

खेळपट्टीचे स्वरूप

या सामन्यासाठी जी खेळपट्टी वापरली जाणार आहे ती दोन सामन्यांना वापरलेली आहे. न्यूझीलंड-आयर्लंड सामन्यातली ही खेळपट्टी करड्या रंगाची फलंदाजीला पोषक आहे आणि ऑस्ट्रेलियातील बाकीच्या खेळपट्ट्यांच्या मानाने कमी हिरवी आहे. गेले चार दिवस ती झाकून ठेवली होती. इथे हवामान आता उष्ण आणि दमट झाले आहे. त्या वातावरणाचा आणि पाणी फवारल्यानंतर तिचे रूप काय असेल हे सामन्यातच कळणार असले तरी अंदाज फलंदाजीला अनुकूल राहील, असा आहे. इथे प्रथम फलंदाजी करणार्‍या संघाने या विश्वचषकात चार वेळा सामना जिंकला आहे. अर्थात, सामना जिंकायला कमीत कमी 160-170 चे लक्ष्य असणे गरजेचे आहे. (T20 World Cup 2022 Ind vs Eng semifinal)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news