इंग्लंडविरुद्ध पंतला संधी शक्य; प्रशिक्षक द्रविड यांचे संकेत | पुढारी

इंग्लंडविरुद्ध पंतला संधी शक्य; प्रशिक्षक द्रविड यांचे संकेत

मेलबर्न;  वृत्तसंस्था :  टी-20 वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारताचा डावखुरा विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला केवळ झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातच संधी मिळाली. मात्र, या सामन्यात पंत अपयशी ठरला. ही बाब प्रशिक्षक राहुल द्रविडसाठी चिंतेचा विषय नाही. मात्र, इंग्लंडविरुद्ध गुरुवारी होणार्‍या सेमीफायनलमध्ये पंतला संधी मिळेल, असे संकेत द्रविडने दिले आहेत.

सुपर-12 च्या पहिल्या चार सामन्यांत पंतला संधी मिळाली नव्हती. त्याच्या स्थानी कार्तिकला संघात स्थान मिळाले होते. हा फलंदाज फिनिशरच्या भूमिकेत संघात आहे. मात्र, हा फलंदाज ऑस्ट्रेलियन खेळपट्टींवर फारसा प्रभावी ठरला नाही.

पंतसंदर्भात बोलताना द्रविडने सांगितले की, एका सामन्यातील कामगिरीच्या बळावर खेळाडूचे आकलन करावे, असे मला तरी वाटत नाही. खेळाडूला आम्ही खेळविणार की नाही, हे एका सामन्याच्या कामगिरीवर ठरत नसते. काहीवेळा सामन्याचे स्वरूप पाहून निर्णय घ्यावे लागतात. यावेळी एखाद्या खास गोलंदाजांसाठी कोणत्या कौशल्याची आम्हाला गरज आहे, याचा विचार करावा लागतो.
संघ व्यवस्थापनाने पंतवरील विश्वास गमावलेला नाही. संघात सहभागी असलेल्या सर्व 15 खेळाडूंवर आमचा विश्वास आहे. मात्र, केवळ 11 खेळाडूच मैदानावर उतरू शकतात आणि हे संघाच्या संयोजनावर आधारित असते. संभवता भारतीय संघ व्यवस्थापन ऋषभ पंतला इंग्लंडचा फिरकी गोलंदाज आदिल रशिदला पर्याय म्हणून पाहात असेल.

Back to top button