डेव्हिड मलान जखमी; इंग्लंडला जबर धक्का | पुढारी

डेव्हिड मलान जखमी; इंग्लंडला जबर धक्का

अ‍ॅडलेड; वृत्तसंस्था :  इंग्लंडचा आक्रमक फलंदाज डेव्हिड मलान जखमी झाल्याने तो टी-20 वर्ल्डकपमध्ये सेमीफायनल सामन्यात भारताविरुद्ध खेळणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. सुपर- 12 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात इंग्लंडने चार विकेटस्ने विजय मिळविला होता. याच सामन्यात मलान जखमी झाला.

इंग्लंडचा उपकर्णधार मोईन अलीने सांगितले की, मलान जखमी आहे. तो एक महान खेळाडू असून दीर्घकाळापासून खेळत आहे. आमच्या सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी तो एक आहे. भारताविरुद्ध कोणत्याही ठिकाणी खेळणे ही एक खास बाब असते. कारण भारत हा क्रिकेटमधील एक मोठी ताकद आहे. या संघाचे चाहतेही मोठ्या प्रमाणात असतात.

 दरम्यान, सेमीफायनलमध्ये मलान खेळू न शकल्यास फिल साल्टला संधी मिळण्याची शक्यता आहे. तरीही इंग्लंड आपली ताकद वाढविण्यासाठी डेव्हिड विली, क्रिस जॉर्डन व टाईमल मिल्स यांना संघात संधी देऊ शकतो. जखमी मलानचा या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावसंख्या 35 इतकी आहे. त्याने या धावा आयर्लंडविरुद्ध 35 चेंडूंत काढल्या होत्या. तरीही भारतासारख्या तुल्यबळ संघाविरुद्ध मलानचे न खेळणे हे इंग्लंडसाठी मोठा धक्का असेल. दरम्यान, जखमी असल्याने जॉनी बेअरस्टोही या वर्ल्डकपला मुकला आहे.

Back to top button