पुढारी ऑनलाईन डेस्क : नेदरलँड्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ अपसेटचा बळी ठरला आहे. नेदरलँड्सने गट 2 मधील त्यांच्या शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव करून सामना जिंकला. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे त्याचा फायदा भारतीय संघाला झाला आहे. रोहित ब्रिगेडने 6 गुणांसह स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत धडक मारणारा तिसरा संघ ठरला आहे. भारताला आज अखेरचा सामना झिम्बाब्वेविरुद्ध खेळायचा आहे.
टी-20 विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेचा संघ पुन्हा एकदा चोकर्स असल्याचे सिद्ध झाले आहे. गेल्या अनेक विश्वचषक स्पर्धेत बलाढ्य संघासह उतरूनही हा संघ कधी पावसामुळे तर कधी ऐनवेळी खराब प्रदर्शन करून स्पर्धेतून बाहेर पडला आहे. भारतीय संघ उपांत्य फेरीत धडक मारणारा तिसरा संघ ठरला आहे. स्पर्धेतील दोन संघ गट-1 मधून निश्चित झाले यात न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांचा समावेश केला आहे.
आफ्रिकेने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या सलामीवीर स्टीफनने नेदरलँड्सला चांगली सुरुवात करून दिली. पॉवरप्लेच्या 6 षटकांत संघाने एकही विकेट न गमावता 48 धावा केल्या आहेत. चांगल्या सुरुवातीनंतर स्टीफन पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. त्याने 30 चेंडूत 37 धावा केल्या. आफ्रिकन गोलंदाजांनी सुरुवातीच्या षटकांमध्ये अधिक धावा खर्च केल्या, परंतु मधल्या षटकांमध्ये टीच्चून मारा करत सामन्यात पुनरागमन केले. त्यामुळे नेदरलँड 20 षटकात 4 विकेट गमावून 158 धावांपर्यंत मजल मारू शकला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा संघ 20 षटकांत 8 विकेट गमावून केवळ 145 धावा करू शकला. दक्षिण आफ्रिकेचे गट 2 मध्ये 5 सामन्यांतून 2 विजय आणि एक ड्रॉ सामन्यासह पाच गुण झाले आहेत. नेदरलँडच्या विजयाने गट 2 ची समीकरणे बदलली आहेत. भारताने थेट उपांत्य फेरी गाठली असून द. आफ्रिका उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. दुसरीकडे पाकिस्तान आणि बांगलादेश संघांचे 4-4 गुण समान आहेत. दोन्ही संघा आज आमने-सामने आले आहेत. या सामन्यातील विजयी संघ उपांत्य फेरीत पोहोचेल.
नेदरलँड्स संघ :
स्टीफन मायबर्ग, मॅक्स ओड, टॉम कूपर, कॉलिन एकरमन, बास डी लीड, स्कॉट एडवर्ड्स (विकेटकीपर/कर्णधार), रूलोफ व्हॅन डेर मेर्वे, लोगन व्हॅन बीक, फ्रेड क्लासेन, पॉल व्हॅन मीकरेन, ब्रँडन ग्लोव्हर
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, हेन्रिक क्लासेन, वेन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, एनरिक नोरखिया, लुंगी एनगिडी