T20 World Cup 2022 NZ vs IRE | न्यूझीलंडचा आयर्लंडवर ३५ धावांनी विजय, ग्रुप-१ मध्ये ७ गुणांसह अव्वल स्थानी | पुढारी

T20 World Cup 2022 NZ vs IRE | न्यूझीलंडचा आयर्लंडवर ३५ धावांनी विजय, ग्रुप-१ मध्ये ७ गुणांसह अव्वल स्थानी

ॲडलेड : T20 वर्ल्डकपमध्ये आज शुक्रवारी आयर्लंड विरुद्ध न्यूझीलंड (T20 World Cup 2022 NZ vs IRE) यांच्यात ॲडलेडच्या ओव्हल मैदानावर सामना झाला. हा सामना न्यूझीलंडने ३५ धावांनी जिंकून ग्रुप- १ मध्ये ७ गुणांसह अव्वल स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडचा सुपर-१२ मधला हा शेवटचा सामना होता. या विजयामुळे केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंड टी२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. न्यूझीलंड सुपर-१२ मधील पहिला संघ आहे ज्याने टी२० वर्ल्डकपच्या सुपर-४ मध्ये स्थान मिळवले आहे. दरम्यान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा एक-एक सामना शिल्लक आहे. जर हे संघ आपआपल्या सामन्यात जिंकले तर रनरेट पाहिले जाईल. न्यूझीलंडचा रनरेट सध्या +२.११३ एवढा आहे. ऑस्ट्रेलिया (-०.३०४) आणि इंग्लंड (+०.५४७) यांच्या तुलनेत न्यूझीलंडचा रनरेट चांगला आहे. यामुळे न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला आहे.

आयर्लंडनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या फिन ॲलन आणि डेव्हॉन कॉनवे जोडीने चांगली सुरुवात केली. पण ॲलन ३२ धावा आणि कॉनवे २८ धावा करुन आउट झाला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनने दमदार खेळी करत अर्धशतक ठोकले.

जोश लिटिलची हॅट्ट्रिक

सतराव्या षटकांत आयर्लंडच्या जोशुआ लिटलने हॅट्ट्रिक करत न्यूझीलंडला पाठोपाठ तीन धक्के दिले. दुसऱ्या चेंडूवर लिटलने केन विलियम्सनला आउट केले. विलियम्सनने ३५ चेंडूत ६१ धावांची खेळी केली. त्यानंतर लिटलने तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर अनुक्रमे जेम्स नीशम आणि मिचेल सँटनरला पायचित केले. न्यूझीलंडचा डाव ६ बाद १८५ धावांवर आटोपला. (T20 World Cup 2022 NZ vs IRE)

त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेला आयर्लंडचा कर्णधार अँड्र्यू बालबर्नी आणि पॉल स्टर्लिंग या सलामीच्या जोडीने दमदार सुरुवात ८ षटकांत ६८ धावा केल्या. त्यानंतर नवव्या षटकांत बालबर्नीची मिचेल सँटनरने विकेट घेतली. तर दहाव्या षटकांत न्यूझीलंडचा फिरकीपटू ईश सोधीने आयर्लंडला दुसरा धक्का दिला. त्याने पॉल स्टर्लिंगला आउट केले. त्यानंतर अकराव्या षटकांत आयर्लंडला तिसरा धक्का बसला. मिचेल सँटनरच्या चेंडूवर टीम साउदीने हॅरी टेक्टरचा झेल टिपला. त्यानंतर आयर्लंडचा डाव गडगडला.

तेराव्या षटकांत गॅरेथ डेलनी फर्ग्यूसनच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर ईश सोधीने आयर्लंडला आणखी एक धक्का देत १५ व्या षटकांत लॉर्कन टकरची विकेट घेतली. आयर्लंडची १५ षटकांत ५ बाद १०३ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर सतराव्या षटकांत साउदीने कर्टिस कॅम्फरला माघारी पाठवले. अठराव्या षटकांत फिओन हँड फर्ग्यूसनच्या चेंडूवर झेलबाद झाला. तर फर्ग्यूसनने आयर्लंडला आणखी एक धक्का देत जॉर्ज डॉकरेलला झेलबाद केले. १९ व्या षटकांत आयर्लंडला नववा धक्का बसला. न्यूझीलंडने आयर्लंडला २० षटकांत ९ गडी बाद करत १५० धावांवर रोखले.

हे ही वाचा :

Back to top button