PAKvsSA T20WC : पाकिस्तानचा द. आफ्रिकेवर 33 धावांनी विजय! | पुढारी

PAKvsSA T20WC : पाकिस्तानचा द. आफ्रिकेवर 33 धावांनी विजय!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

टी 20 विश्वचषक स्पर्धेची उपांत्य फेरीची शर्यत रंजक बनली आहे. गुरुवारी झालेल्या रोमहर्षक लढतीत पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 33 धावांनी पराभव केला. या विजयासह पाकिस्तानचे 4 सामन्यांत 4 गुण झाले आहेत. त्यांचा एक सामना बाकी आहे. तर भारत अजूनही गट 2 मध्ये अव्वल स्थानी आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 185 धावा केल्या होत्या. पाकिस्तानी गोलंदाजांनी नंतर कहर केला आणि आफ्रिकेला सुरुवातीचे धक्के दिले. दरम्यान आफ्रिकेच्या फलंदाजीदरम्यान पाऊस आला. डकवर्थ लुईस नियम लागू झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला 14 षटकांत 142 धावांचे लक्ष्य मिळाले. पाऊस थांबल्यानंतर सामना सुरू झाला, तेव्हा आफ्रिकेचा डाव गडगडला. पाकिस्तानने जोरदार पुनरागमन करत विजय नोंदवला.

पाकिस्तानच्या या विजयाने ग्रुप-2 चे समीकरण बदलू लागले आहे. चार गुणांसह पाकिस्तान आता गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. भारत अजूनही गटात अव्वल आहे तर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानचा शेवटचा सामना बांगलादेशशी आहे, त्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत जायचे असेल तर हा सामना जिंकावाच लागेल. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेला शेवटचा सामना गमवावा लागणार आहे.

दरम्यान, विजयासाठी आवश्यक 186 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मैदानात उतरलेल्या द. आफ्रिका संघाची सुरुवात खराब झाली. पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शाहीन आफ्रिदीने पहिले यश मिळवत द. आफ्रिकेचा कर्णधार क्विंटन डिकॉकला शुन्यावर बाद केले. पहिल्या षटकाअखेर त्यांची धावसंख्या 1 बाद 1 होती. त्यानंतर रुसो आणि बावुमा जोडी संघाचा डाव सावरेल असे वाटले पण, त्यांना दुसरा झटका रुसोच्या रुपात बसला. शाहीन आफ्रिदीने फेकलेल्या तिस-या षटकाचा चौथा चेंडू रुसोने थर्ड मॅनच्या दिशेने फटकावला. पण तिथे उभा असणा-या नसीमने हा चेंडू झेलला आणि याचबरोबर रुसो 7 धावा करून बाद झाला. तिस-या षटकाअखेर द. आफ्रिकेची धावसंख्या 2 बाद 16 होती. यानंतर मार्करम मैदानात उतरला. त्याने कर्णधार बावुमाला सुरेख साथ दिली. चौथ्या षटकात दोघांनी हरिस रौफची गोलंदाजी फोडून काढली. बावुमा-मार्करमने दोन-दोन चौकार फटकावत त्या षटकात 20 धावा वसूल केल्या. त्यामुळे चौथ्या षटकाअखेर द. आफ्रिकेची धावसंख्या 2 बाद 36 पर्यंत पोहचली. नसीम शाहने पुढच्या षटकात दोघांना वेसण घातली. त्याने या षटकात केवळ 3 धावा दिल्या. पॉवरप्लेचे शेवटचे षटक मोहम्मद वसीमने फेकले. त्याच्या या षटकात बावुमा-मार्करम जोडीने 9 धावा मिळवल्या. पॉवरप्ले संपला तेव्हा द. आफ्रिकेची धावसंख्या 2 बाद 48 झाली होती. 7 व्या षटकात 17 धावा वसूल करत द. आफिकेने आपले अर्धशतक पूर्ण केले. हरिस रौफच्या या षटकात बावुमाने एक षटकार, तर मार्करमने दोन चौकार लगावले.

आठवे षटक द. आफ्रिकेसाठी खराब

आठवे षटक द. आफ्रिकेसाठी खराब गेले. बाबर आझमने शादाब खानच्या हाती चेंडू सोपवला. कर्णधाराने आपल्यावर दाखवलेला विश्वास त्याने सार्थ ठरवला. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर घातक ठरत असलेल्या बावुमाला त्याने विकेटकीपर रिझवान करवी झेलबाद केले. बावुमाने 19 चेडूत 4 चौकार आणि एक षटकाराच्या सहाय्याने 36 धावा केल्या. त्यानंतर तिस-याच चेंडूवर शादाबने मार्करमचा (20 धावा, 4 चौकार) त्रिफळा उडवला. आठव्या षटकाअखेर द. आफ्रिकेची धावसंख्या 4 बाद 67 होती. नवाजने 9 व्या षटकात भेदक मारा केला. त्यामुळे क्लासेन-स्टब्स जोडीला केवळ 2 धावा काढता आल्या. या षटकानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खेळ थांबण्यात आला. दक्षिण आफ्रिकेने नऊ षटकांत 2 गडी बाद 69 धावा केल्या आहेत. डकवर्थ लुईस नियमानुसार ते अजूनही 16 धावांनी पाकिस्तानच्या मागे आहेत. सामना इथेच थांबला पाकिस्तानला विजयी घोषित करण्यात येईल.

पॉवरप्लेमध्येच पाकचा डाव गडगडला…

दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण त्याचा हा निर्णय योग्य ठरला नाही. पॉवरप्लेच्या सहा षटकांमध्ये त्यांनी तीन विकेट गमावल्या. मोहम्मद रिझवान (4), मोहम्मद हरिस (28) आणि बाबर आझम (6) हे तीन दिग्गज फलंदाज तंबूत परतले. यावेळी पाकची धावसंख्या 42 होती. त्यानंतर 6.3 व्या षटकात शान मसूद माघारी परतला. त्याला टेम्बा बावुमाच्या हाती एनरिच नॉर्टजेने झेलबाद केले. मसूदने सहा चेंडूंत दोन धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर मोहम्मद नवाज क्रीझवर आला. त्याने इफ्तिखार अहमद सोबत संघाचा डाव सावरला. दोघांनी अर्धशतकी (38 चेंडूत 52 धावा) भागिदारी पूर्ण केली. पण शम्सीने ही जोडी फोडली. त्याने नावाजला पायचीत पकडले आणि पाकच्या संघाला पुन्हा एकदा खिंडार पाडले. यानंतर मैदानात शादाब खान उतरला. शादाब-इफ्तिकार जोडीने पुन्हा एकदा पाकचा डाव सावरत अर्धशतकी (22 चेंडूत 51 धावा) भागिदारी पूर्ण केली. दोघांनी चौकार षटकारांची आतषबाजी केली. त्यांनी 14 व्या षटकात 10, 15 व्या षटकात 15, 16 व्या षटकात 15, 17 व्या षटकात 13, 18 व्या षटकात 11, 19 व्या षटकात 18 धावा वसूल केल्या. 19 व्या षटकात पाकिस्तानला सलग दोन धक्के बसले. नॉर्टजेने शादाब खान (22 चेंडूत 52 धावा) आणि वासीमला (0) बाद केले. त्यानंतर 20 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इफ्तिकार अहमदही (35 चेंडूत 51 धावा) तंबूत परतला. रुसोने सीमारेषेवर त्याचा अप्रतिम झेल पकडला. ही विकेट रबाडाने घेतली.

नवाजच्या विकेटचा घोळ…

द. आफ्रिकेचा फिरकीपटू शम्सीने 13 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डावखु-या नवाजने स्विप मारण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कडा घेऊन पॅडवर आदळला. शम्सीने तत्काळ जोरदार अपील केले. त्याचवेळी चेंडू शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने गेल्याने नवाजने रन घेण्यासाठी धाव घेतली. तो खेळपट्टीच्या मध्यापर्यंत आलाहोता. पणनॉन स्ट्रायकर इफ्तिकारने त्याला मागे जाण्यास सांगितले. नवाज क्रिजमध्ये जाण्यासाठी वळला त्याचवेळी पंचांनी शम्सीने केलेल्या अपीलवर नवाज पायचीत असल्याचा निर्णय दिला. तर त्याचवेळी क्रिजमध्ये जाण्यासाठी परतलेला नवाज फिल्डरच्या अचून थ्रो ने धावबाद झाला. इथे नावाज आणि इफ्तिकार यांचे पंचांनी पायचीत असल्याचा निर्णयाकडे लक्षच गेले नाही. रिप्लेमध्ये चेंडू बॅटवर आदळल्याचे दिसले. त्यामुळे नवाजने जर डीआरएस घेतला असता तर तो नक्कीच नाबाद असता. पण एकंदारीत झालेल्या घोळामुळे तो तंबूत परतला.

बाबर आझम पुन्हा फेल

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा फेल गेला. तो 15 चेंडूत सहा धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. बाबरला लुंगी एनगिडीने बाद केले. षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो कागिसो रबाडाच्या हाती झेलबाद झाला. रबाडाने सीमारेषेच्या दिशेने मागे धावत जात हा अवघड झेल घेतला.

पाकिस्तानला सलग दोन धक्‍के

पहिल्‍याच षटकात पाकिस्‍तानला धक्‍का बसला. चार धावांवर खेळणार्‍या मोहम्मद रिजवान याला वेन पार्नेल याने तंबूत धाडले. रिजवान बाद झाल्‍यानंतर फलंदाजीला आलेल्‍या  मोहम्मद हरीसने दोन चौकार, दोन षटकार लगावत दडपण कमी केले. पाचव्‍या षटकात एनरिच नॉर्टजेने 28 धावांवर हारिसला पायचीत केले. पाच षटकानंतर पाकिस्‍तानने दोन गडी गमावत 38 धावा केल्‍या होत्या.

दक्षिण आफ्रिकेच्या संघात दोन बदल

दक्षिण आफ्रिकेच्या संघात दोन बदल करण्यात आले आहेत. स्टार फलंदाज डेव्हिड मिलर दुखापतीमुळे हा सामना खेळत नाहीये. त्याच्या जागी हेनरिक क्लासेनचा समावेश करण्यात आला आहे. तर केशव महाराजच्या जागी तबरेज शम्सीला संधी मिळाली आहे. पाकिस्तान संघात एक बदल करण्यात आला आहे. फखर जमानच्या जागी मोहम्मद हारिसला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.

ग्रुपप-2 मधून दोन संघ उपांत्य फेरीत जातील. भारत आणि दक्षिण आफ्रिका सध्या गुणतालिकेत 1 आणि 2 क्रमांकावर आहेत. पाकिस्तानने पहिल्या तीन सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला आहे. अशा स्थितीत आज दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ते पराभूत झाले तर उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडतील. पण पाकिस्तानने विजय मिळवला तरी सुद्धा त्यांना पुढील सामन्यात बांगलादेश विरुद्ध विजय मिळवावा लागेल. तसेच उर्वरित भारत विरुद्ध झिम्बाबे आणि द. आफ्रिका विरुद्ध नेदरलँड सामन्यांच्या निकालांवर लक्ष ठेवावे लागेल.

दक्षिण आफ्रिकेचा संघ :

क्विंटन डिकॉक (विकेटकीपर), तेम्बा बावुमा (कप्तान), रिले रोसो, एडेन मार्करम, हेनरिच क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, वेन पार्नेल, कगिसो रबाडा, लुंगी एंगिडी, एनरिच नॉर्त्जे, तबरेज शम्सी,

पाकिस्तानचा संघ :

मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), बाबर आजम (कप्तान), मोहम्मद हारिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन अफरीदी, हारिस रऊफ, नसीम शाह

 

Back to top button