Suryakumar Yadav T20 Rankings : सूर्यकुमार बनला पहिल्या क्रमांकाचा फलंदाज! पाकच्या रिझवानला टाकले मागे | पुढारी

Suryakumar Yadav T20 Rankings : सूर्यकुमार बनला पहिल्या क्रमांकाचा फलंदाज! पाकच्या रिझवानला टाकले मागे

पुढारी ऑनलाईन डेस्क : ICC T20 Rankings : भारताचा स्टार फलंदाज सुर्यकुमार यादवने टी-20 क्रमवारीत अव्वल क्रमांकाची खुर्ची काबीज करून पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानची राजवट संपवली आहे. 32 वर्षीय उजव्या हाताच्या फलंदाजाला टी 20 विश्वचषकातील उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत सुर्यकुमार पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनला आहे तर पाकिस्तानी फलंदाज मोहम्मद रिझवान एका स्थानाच्या घसरणीसह दुसऱ्या क्रमांकावर गेला आहे.

टीम इंडियाचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवने टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. सूर्या आता ICC T20 क्रमवारीत नंबर 1 फलंदाज बनला आहे. पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकत त्याने हे स्थान मिळवले आहे. आज टीम इंडियाचा बांगलादेशविरुद्ध सामना सुरू असतानाच ICC ने नवीन T20 क्रमवारी जाहीर केली.

ताज्या टी-20 क्रमवारीत सूर्यकुमार यादवचे 863 गुण आहेत, तर पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानचे 842 गुण आहेत. म्हणजेच सूर्या आता खूप पुढे गेला आहे, सूर्याला त्याच्या उत्कृष्ट फॉर्मचा फायदा T20 वर्ल्ड कपमध्ये झाला आहे. या T20 विश्वचषकमध्ये भारताने केलेल्या सर्वाधिक धावांच्या यादीत तो विराट कोहलीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

सूर्यकुमार यादवने T20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या 3 सामन्यात 134 धावा केल्या. त्याने पाकिस्तानविरुद्ध 15, नेदरलँडविरुद्ध नाबाद 51 आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 68 धावा केल्या. सध्या सूर्यकुमार यादव T20 मध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून सूर्यकुमार भारतासाठी सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. सूर्यकुमार यादवने या वर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आठ अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे.

गोलंदाजांच्या क्रमवारीत टॉप-10 मध्ये एकही भारतीय नाही. त्याचबरोबर अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्या तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. गोलंदाजांमध्ये राशिद खान आणि अष्टपैलूंमध्ये शाकिब अल हसन अव्वल स्थानावर आहेत.

Back to top button