EngvsNZ T20WC : इंग्लंडचा न्यूझीलंडवर विजय, ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग खडतर | पुढारी

EngvsNZ T20WC : इंग्लंडचा न्यूझीलंडवर विजय, ऑस्ट्रेलियाचा सेमीफायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग खडतर

पुढारी ऑनलाईन डेस्क : EngvsNZ T20WC : विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव करून इंग्लंडने उपांत्य फेरी गाठण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. गाबा येथे खेळल्या गेलेल्या महत्त्वपूर्ण सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडचा 20 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने 20 षटकांत 179 धावा केल्या, प्रत्युत्तरात ग्लेन फिलिप्सच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंडचा संघ 20 षटकांत 6 बाद 159 धावाच करू शकला.

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर सलामीवीर जोस बटलर (73 धावा) आणि अॅलेक्स हेल्स (52 धावा) यांच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने न्यूझीलंडसमोर 180 धावांचे लक्ष्य ठेवले. ब्रिटिश संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 179 धावा केल्या. किवीजकडून लॉकी फर्ग्युसनने सर्वाधिक दोन बळी घेतले. टीम साऊदी, मिचेल सँटनर आणि ईश सोधीला प्रत्येकी एक विकेट मिळाली.

प्रत्युत्तरात 180 धावांचे लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या किवी संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर कॉनवे (3) दुस-या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला. यावेळी त्यांची धावसंख्या 8 होती. ख्रिस वोक्सने इंग्लंडला हे पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर सॅम कुरन याने पाचव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर मोठा झटका दिला. त्याने आक्रमक फलंदाज फिन ॲलनला (16) पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

विल्यमसन-फिलिप्स जोडीने डाव सावरला…

5 षटकांत 28 धावांवर दोन विकेट गमावल्यानंतर न्यूझालंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि फिलिप्सने संघाचा डाव सावरला. या जोडीने 75 धावांच्या भागिदारीचा टप्पा पार केला. ग्लेन फिलिप्सने आक्रमक फलंदाजीचे प्रदर्शन केले. 13.4 व्या षटकात त्याने आदील रशीदच्या गोलंदाजीवर दोन धावा घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 3 षटकार आणि 3 चौकारांच्या सहाय्याने त्याने 25 चेंडूत 50 धावा फटकावल्या. दरम्यान, 10 व्या षटकात मोईन अलीने आदिल रशीदच्या चेंडूवर ग्लेन फिलिप्सचा एक सोपा झेल सोडला. तेव्हा फिलिप्स 15 धावांवर खेळत होता. याचा फिलिप्सने फायदा घेतला आणि पुन्हा एकदा चमकदार फलंदाजी करून अर्धशतक झळकावले. त्याने विल्यमसन सोबत 91 धावांची भागिदारी केली. पण 40 धावांवर विल्यमसन बाद झाला. त्यावेळी न्यूझीलंडची धावसंख्या 3 बाद 119 होती. यानंतर काही अंतरांनी दोन विकेट पडल्या. जेम्स नीशम, डॅरिल मिशेल स्वस्तात बाद झाले. फिलिप्स एका बाजूने झुंझार फलंदाजी करत होता. पण तो 17.3 व्या षटकात माघारी परतला. त्याने 4 चौकार आणि 3 षटकार खेचून 36 चेंडूत 62 धावा केल्या. अखेर विजयासाठी आवश्यक धावा आणि शिल्लक चेंडू यांच्यातील अंतर वाढत गेले आणि न्यूझीलंडचा संघ 20 षटकांमध्ये 159 धावांपर्यंत मजल मारू शकला. याचबरोबर इंग्लिश संघाने न्यूझीलंडवर 20 धावांनी विजय मिळवून सेमीफायनलमध्ये पोहचण्याच्या शर्यतीत आपले आव्हान कायम ठेवले.

तत्पूर्वी, पहिला फलंदाजी करताना इंग्लिश सलामीवीर जोस बटलर आणि अॅलेक्स हेल्स यांनी संघाला आश्वासक सुरुवात करून दिली त्यांनी 10.2 षटकांच्या 81 धावांची सलामी दिली. हेल्सने अर्धशतक फटकावले. पण तो 52 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. सँटनरने त्याला विकेटकीपर कॉनवे करवी यष्टीचीत केले. यानंतर मोईन अलीने निराशा केली. तो स्वस्तात बाद झाला. त्यावेळी इंग्लंडची 2 बाद धावसंख्या 108 होती. त्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनने बटलला साथ देण्याचा प्रयत्न केला. त्याने 1-1 चौकार-षटकार ठोकून 14 चेंडूत 20 धावा फटकावल्या. त्याला लॉकी फर्ग्युसनने क्लिन बोल्ड करून माघारी धाडले. यावेळी इंग्लिश संघाने दीडशे धावांचा पल्ला पार करत 153 धावांपर्यंत मजल मारली होती. पण त्यानंतर हॅरी ब्रुक (7) आणि जोस बटलर (73) झटपट माघारी परतले. बेन स्टोक्सही फटकेबाजीच्या नादात 19.5 व्या षटकात एलबीडब्ल्यू बाद झाला. फर्ग्युसनने त्याची विकेट पटकावली.

लिव्हिंगस्टोन, ब्रुक, बटलर आउट

लॉकी फर्ग्युसनने इंग्लंडला तिसरा धक्का दिला. त्याने 18 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर लियाम लिव्हिंगस्टोनला क्लीन बोल्ड केले. लिव्हिंगस्टोनने 14 चेंडूत 20 धावा केल्या. त्याच्या पाठोपाठ 19व्या षटकात हॅरी ब्रूक आला. त्याने तीन चेंडूंत सात धावा केल्या. ब्रुकला फिन ऍलनच्या हाती टिम साऊदीने झेलबाद केले. त्याच्यानंतर कर्णधार जोस बटलर 47 चेंडूत 73 धावा करून धावबाद झाला. बटलरने आपल्या खेळीत सात चौकार आणि दोन षटकार मारले.

मोईल अली बाद, तर बटलरची फिफ्टी..

14 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इंग्लंडला दुसरा धक्का बसला. ईश सोधीने मोईन अलीला ट्रेंट बोल्ट करवी झेलबाद केले. मोईनने सहा चेंडूत पाच धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोन क्रीजवर आला. जॉस बटलरने त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर 18 वे टी-20 अर्धशतक पूर्ण केले. यावेळी इंग्लंडची धावसंख्या 14 षटकांत 2 बाद 110 धावा होती.

न्यूझीलंडला पहिले यश

न्यूझीलंडला 11व्या षटकात पहिला यश मिळाले. अॅलेक्स हेल्स अर्धशतक झळकावून बाद झाला. हेल्सला मिचेल सँटनरने यष्टिरक्षक डेव्हॉन कॉनवेच्या हाती यष्टिचित केले. त्याने 40 चेंडूत 52 धावा केल्या. 11 व्या षटकांअखेर इंग्लंडची धावसंख्या एका विकेटच्या मोबदल्यात 85 होती.

बटलर आणि हेल्सने यांनी सुरुवातीपासूनच न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर आक्रमण केले. दोघा सलामीवीरांनी 6.2 षटकांत 50 धावांची भागीदारी पूर्ण केली. पाचव्या षटकात आलेल्या टीम साऊदीला अॅलेक्स हेल्सने एक षटकार आणि दोन चौकार लगावले. या षटकात हेल्सने 15 धावा वसूल केल्या.

जोस बटलरचा 100 वा सामना..

जोस बटलर इंग्लंडकडून 100 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. दोन्ही संघांनी प्लेइंग 11 मध्ये कोणताही बदल केलेला नाही. न्यूझीलंडचा संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे, तर इंग्लंड संघाला सुपर 12 फेरीत आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशातच त्यांना सेमीफायनलच्या शर्यतीत आपले आव्हान टीकवून ठेवायचे असल्यास आजचा न्यूझीलंड विरुद्धचा सामना जिंकावाच लागणार आहे.

दोन्ही संघांचे प्लेइंग-11…

इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार/विकेटकीपर), अॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक, मोईन अली, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड.

न्यूझीलंड : फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (विकेटकीपर), केन विल्यमसन (कर्णधार), ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट.

न्यूझीलंड ग्रुप-1 मध्ये अव्वल

न्यूझीलंडने आतापर्यंत एकूण 3 सामने खेळले आहेत. अफगाणिस्तानविरुद्धचा सामना पावसामुळे वाहून गेला. किवी संघाने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. गट 1 मध्ये 5 गुणांसह हा संघ पहिल्या स्थानावर आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडचा सामना पावसामुळे होऊ शकला नाही. त्यानंतर इंग्लंडने अफगाणिस्तानचा पराभव केला, तर आयर्लंडकडून पराभव पत्करावा लागला. इंग्लिश संघ गट-1 मध्ये 3 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.

इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 22 टी-20 सामने झाले आहेत. इंग्लंडने 12 आणि न्यूझीलंडने 8 सामने जिंकले असून एक सामना बरोबरीत आणि एक अनिर्णित राहिला आहे.

Back to top button