T-20 World Cup : के. एल. राहुलचे करायचे काय? | पुढारी

T-20 World Cup : के. एल. राहुलचे करायचे काय?

क्रिकेटमध्ये जिंकण्याइतके महत्त्व दुसर्‍या कशाला नसते. तेव्हा एखादा संघ सामना जिंकतो तेव्हा अनेक चुकांकडे कानाडोळा केला जातो, पण जेव्हा संघ सामना हरतो तेव्हा मात्र याच चुका ठळकपणे दिसायला लागतात. या विश्वचषकात (T-20 World Cup) आपले सामने बघितले तर पाकिस्तानविरुद्धच्या विजयाने आपण सुखावलो तरी तो निसटता होता हे विसरून चालणार नाही, नेदरलँडविरुद्ध आपण जिंकलो, पण तो दणदणीत विजय नव्हता आणि परवा तर आपण हरलोच. या तिन्ही सामन्यांत चुका आपल्या त्याच म्हणजे संघ निवडीच्या आणि मुख्य म्हणजे के. एल. राहुलच्या खराब कामगिरीच्या होत्या, पण आता हरल्याने त्या चुकांचा ऊहापोह होणे गरजेचे ठरते. के. एल. राहुलला नक्की झालंय काय? त्याला आपला दर्जा सिद्ध करायची निश्चितच गरज नाही. त्याच्या तंत्रात दोष नाही, दोष असलाच तर त्याच्या सध्याच्या मानसिकतेत आहे. राहुलच्या या विश्वचषकातील सलग तिसर्‍या अपयशाने त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह ऊठत आहेत.

विश्वचषकाच्या (T-20 World Cup) आधीच्या आशिया चषकात पाकिस्तान विरुद्ध दोन सामन्यांत 0 आणि 28, श्रीलंकेविरुद्ध 6, तर दुबळ्या हाँगकाँगविरुद्ध 36 आणि अफगाणिस्तानविरुद्ध 62 धावा त्याने केल्या. त्यांनतर घरच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तीन सामन्यांत त्याने 55, 10 आणि 1 धावा केल्या आणि या विश्वचषकात 4, 9 आणि 9 धावा आहेत. हा अगदी नजीकचा इतिहास बघितला तर महत्त्वाच्या सामन्यात तो ढेपाळला आहे. राहुलला गरज आहे ती समुपदेशनाची. भारतीय संघाने समुपदेशक म्हणून पॅडी अपटॉन यांची नियुक्ती केली आहे. जगातील ते एक नामवंत मानसिक कणखरता आणि क्रीडा मानसशास्त्राचे समुपदेशक आहेत. आज राहुलचा आत्मविश्वास कमी झालाय. बाद झाल्यावर ज्या पद्धतीने तो स्वतःवर चिडतोय ते बघता तो त्याचा नैसर्गिक खेळ सोडून यशस्वी होण्याच्या दडपणाखाली खेळत आहे आणि त्याचमुळे तो सतत त्याच चुका करत आहे. पॅडी अपटॉन यांच्या समुपदेशनाने राहुल पुन्हा बहरेलही, पण प्रश्न आहे तो वेळेचा.

द. आफ्रिकेचा सामना गमावल्याने आपल्याला पुढचे सामने जिंकावेच लागतील तेव्हा राहुलमध्ये दोन दिवसांत फरक पडेल का काही दुसर्‍या पर्यायांचा विचार केला पाहिजे? भारतीय संघात पर्यायी फलंदाज ऋषभ पंत हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. ऋषभ पंत हा नैसर्गिक सलामीचा फलंदाज आहे का? तर उत्तर नाही हे आहे, पण टी-20 क्रिकेटमध्ये विशेषतः पहिल्या पॉवर प्लेचा फायदा घ्यायला तो नक्कीच उपयुक्त आहे. वॉर्नर-फिंच, कॉन्वे-अ‍ॅलन, डिकॉक-बवुमा या डाव्या-उजव्या जोड्यांची कामगिरी बघता आपल्यालाही संघात डाव्या-उजव्या जोडीचा पर्याय होईल. रोहित शर्मा-ऋषभ पंत जोडी नुसती डावी-उजवी म्हणूनच नाही तर दोघांच्या फलंदाजीच्या पद्धतीने गोलंदाजांची लय पूर्ण बिघडू शकते. 90 च्या दशकात एक दिवसीय क्रिकेटच्या फलंदाजीचे काही ठोकताळे होते. पहिल्या 15 षटकांत नवा चेंडू खेळून काढत 50 धावा केल्या तरी त्यात संघ समाधान मानायचा आणि फटकेबाजी काय ती शेवटच्या 10 षटकांसाठी राखून ठेवली असायची. श्रीलंकेने या खेळाचे स्वरूपच पालटवले.

संघात डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून आलेल्या जयसूर्याने फटकेबाजीच्या क्षमतेने सलामीची जागा घेतली आणि त्याला जोडीदार मिळाला तो यष्टिरक्षक कालुविथरणा. या दोघांनी धावा काढायची समीकरणेच बदलली आणि त्याची परिणीती श्रीलंका 1996 चा विश्वचषक जिंकण्यात झाली. मुळात सलामीचे नसलेले, पण उत्तम सलामीची जोडी म्हणून यश पाहिलेले याहून उत्तम उदाहरण नाही. तेव्हा मर्यादित षटकांसाठी तरी ऋषभ पंत नैसर्गिक सलामीचा फलंदाज आहे का नाही हा प्रश्न गौण ठरतो. दिनेश कार्तिकची द. आफ्रिकेच्या सामन्यात पाठ दुखावली असल्याने आजच्या बातमीनुसार तरी तो बांगलादेशच्या लढतीत खेळायची शक्यता कमी आहे. तेव्हा पंतला संधी मिळणारच आहे. संघव्यवस्थापनाला निर्णय घ्यायचा आहे तो राहुलचा आत्मविश्वास परत यायची वाट बघत त्याला सलामीला खेळवायचा का पंतला सलामीला पाठवून राहुलला मधल्या फळीत खेळवायचे याचा, नाही तरी राहुल अपयशी ठरत आहे, त्यात पंत ठरला म्हणून फारसा फरक पडणार नाही, पण निर्णय घ्यायला वेळ खूप कमी आहे.

निमिष पाटगावकर 

Back to top button