IND vs SA : चुकीच्या संघ निवडीने भारताचा पराभव | पुढारी

IND vs SA : चुकीच्या संघ निवडीने भारताचा पराभव

द. आफ्रिकेला आपल्या माफक लक्ष्यापासून रोखण्यासाठी गरज होती ती आपल्या जलदगती गोलंदाजांनी पर्थच्या खेळपट्टीचा फायदा घेऊन गोलंदाजी करण्याची आणि त्याला साथ हवी होती ती उत्तम क्षेत्ररक्षणाची. आपल्या जलदगती गोलंदाजांनी आपले काम चोख केले, पण भारताच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणाचा फटका आपल्याला बसला. कोहलीसारख्या उत्तम क्षेत्ररक्षकाने हातातील झेल टाकणे, रोहित शर्माकडून दोनदा रनआऊट चुकणे यांसारख्या चुका छोटे लक्ष्य असताना अक्षम्य असतात.

बाऊन्सला साथ देणार्‍या खेळपट्टीवर जलदगती गोलंदाज वेगाच्या नादात भरकटले जायची शक्यता असते. योग्य लेंग्थ ठेवली तर चेंडू पुढचे काम आपले आपण करतो. अर्शदीपने आपल्या पहिल्याच षटकात द. आफ्रिकेला दोन महत्त्वाचे हादरे दिले. आपल्या पहिल्याच आऊटस्विंगवर त्याने क्विंटन डी कॉकला खेळणे भाग पाडले आणि स्लिपमध्ये पकडले आणि तिसर्‍या चेंडूवर धोकादायक रोसाऊला पायचीत पकडले. अर्शदीप रिव्ह्यू घ्यायला उत्सुक नव्हता, पण रोहित शर्माच्या रिव्ह्यूच्या निर्णयाने आपण मोठा अडसर दूर केला.

या दोन बळीनंतर द. आफ्रिकेला बॅकफूटवर ढकलायला आपण कमी पडलो. द. आफ्रिका या विश्वचषकात चोकर्सचा शिक्का पुसून काढायला खेळत आहे आणि त्यांनी या सामन्यात ते दाखवले. द. आफ्रिकेने शम्सीच्याऐवजी एन्गिडीला घ्यायचा जो सुज्ञपणा दाखवला तो आपण दाखवला नाही. पर्थसारख्या खेळपट्टीवर जर आपण अश्विन आणि हुडा यांना खेळवणार असलो आणि त्यातील हुडाला गोलंदाजीही देण्यात आली नाही तर त्याचे संघातील स्थान काय होते असा प्रश्न पडतो. सामन्याच्या उत्तरार्धात इथे पर्थला हवा थंड झालेली असते. त्याचा परिणाम हा खेळपट्टीवरच्या गवतावर होऊन चेंडूला उत्तम उसळी मिळते तसेच तो बॅटवर जलद येतो.

या परिस्थितीचा फायदा घ्यायला आपल्याकडे अश्विन किंवा हुडाच्या ऐवजी हर्षल पटेल असता तर कदाचित आपण आफ्रिकेच्या धावा रोखू शकलो असतो. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली याचे कारण म्हणजे पाकिस्तान – नेदरलँड सामन्याला वापरलेलीच खेळपट्टी या सामन्याला वापरली गेली. एक सामना खेळून झाल्यावर खेळपट्टीला जे खाचखळगे पडतात ते आपल्या सामन्याच्या आधी रोलर फिरवला तरी खेळपट्टी पूर्ववत होऊ शकत नाही. तेव्हा या खेळपट्टीवर दिवसातली चौथी फलंदाजी करणे कठीण जाणार होते. त्याचप्रमाणे शनिवारची थंडी आणि मळभ जाऊन सकाळपासून इथे जरी लख्ख सूर्यप्रकाश होता तरी थंडी आणि बोचरे वारे कमी व्हायचे काही नाव नाही. स्वान नदीच्या एका बाजूला जुने स्टेडियम आहे तर दुसर्‍या बाजूला हे नवे स्टेडियम आहे. जुने स्टेडियम चहूबाजूंनी मोकळे असल्याने तिने नदीवरून येण्यार्‍या वार्‍यांचा स्विंगवर परिणाम होतो.

नवे स्टेडियम एखाद्या विहिरीसारखे तसे चहूबाजूंनी बंदिस्त आहे, पण पर्थच्या विकेटचे वेग आणि बाऊन्स गुणधर्म राखून आहे म्हणूनच या मैदानाला ‘मौत का कुआ’ म्हणतात. या मौत का कुआत आपण फलंदाजीला उतरलो तेव्हा रोहित शर्मा आणि राहुलने सावध सुरुवात केली, पण आफ्रिकेच्या एन्गिडीने आपली निवड सार्थ ठरवली. एकेक षटकार मारून रोहित शर्मा आणि राहुल स्थिरस्थावर होत असताना एन्गिडीच्या चेंडूच्या बाऊन्सचा रोहित शर्माचा अंदाज चुकला आणि चेंडू बॅटच्या मध्यावर लागायच्या ऐवजी वरच्या भागात लागून त्याने सोपा झेल दिला. राहुलचे उत्तम जलदगती गोलंदाजांविरुद्ध खेळतानाचे फुटवर्क त्याचे ऑफ स्टम्पच्या बाहेरच्या चेंडूला छेडणे हे बघता गोलंदाज जणू त्याला चौथा काल्पनिक स्टम्प पकडून मारा करतात आणि तो स्लिपमध्ये झेल वारंवार काढून देत आहे.

विराट कोहलीला कधीतरी लॉ ऑफ अ‍ॅव्हरेज लागणारच होता इतका तो गेले काही सामने उत्तम खेळत होता. तो उत्तम खेळत होता, पण उसळत्या चेंडूवर त्याचा पूल फसला. दीपक हुडाला पर्थच्या खेळपट्टीचा अंदाज आलाच नाही. मुख्य म्हणजे दीपक हुडाचा फलंदाजीचा क्रम हा कार्तिकच्या वरती का होता हे अनाकलनीय होते. कारण जर फटकेबाजीसाठी असेल तर पॉवर प्ले संपला होता. सूर्यकुमार यादवने धोके घेत धावफलक हलता ठेवला. त्याने दिनेश कार्तिकबरोबर केलेली 40 चेंडूंत 52 धावांची भागीदारी आणि सूर्याच्या वैयक्तिक 68 म्हणजे संघाच्या निम्म्यापेक्षा जास्त धावा यामुळे आपण 133 चा टप्पा तरी गाठला.

सूर्याची फटकेबाजी नैसर्गिक असते तेव्हा त्याला जोखडात बांधता येणार नाही, पण तरीही ऑस्ट्रेलियात त्याचे अप्पर कटचे फटके फसत आहेत. या सामन्याने पुन्हा एकदा दाखवून दिले की आपली फलंदाजीची मदार ही सूर्या-कोहलीवरच आहे. या पराभवाने आपल्याला खचून जायची गरज नाही, पण आपल्याला खूप गोष्टींकडे डोळसपणे बघून सुधाराव्या लागतील. राहुलचे अपयश आपल्याला महागात जात आहे. सामन्याच्या शेवटी दिनेश कार्तिक जायबंदी झाला आणि ऋषभ पंत मैदानात आला. कार्तिकची दुखापत कितपत आहे माहीत नाही, पण पंत संघात आला तर फलंदाजीला आधार नक्कीच येईल. अश्विनचा टी-20 गोलंदाज म्हणून प्रभाव पडत नसताना आपल्याला ऑस्ट्रेलियातील परिस्थितीचा लाभ घ्यायला हर्षल पटेलला लवकरात लवकर संधी द्यावी लागेल. विश्वचषकाच्या उपांत्य फेरीचा दरवाजा उघडायची संधी या सामन्याने आपल्याला होती ती आपण गमावली. त्याचबरोबर पाकिस्तानचा मार्गही आपण खडतर केला.

निमिष पाटगावकर

Back to top button