

पुढारी ऑनलाईन डेस्क : अखेर षटकातील अखेरच्या चेंडूपर्यंत गेलेल्या सामन्यात टीम इंडियाने बांगलादेश विरुद्ध पाच धावांनी राेमहर्षक विजय मिळवला. बांगलादेशने नाणेफेक जिंकूनगोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 20 षटकात 6 विकेट गमावून 184 धावा केल्या. १८५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने धडाकेबाज सुरुवात करत पाॅवर फ्लेमध्ये ६० धावा केल्या. मात्र पावसामुळे काही मिनिटे सामन्यात व्यत्यय आला. दाेन्ही संघ पुन्हा मैदानात उतरले तेव्हा डकवर्थ लुईस नियमानुसार (डीएलएस) बांगलादेश समाेर ५४ चेंडूत ८४ धावांचे आव्हान हाेते.
अखेरच्या षटकात बांगलादेशला २० धावांची गरज हाेती. कर्णधार राेहित शर्माने अखेरच्या षटकासाठी अर्शदीपच्या हाती चेंडू दिला. त्याने पहिल्या चेंडूत एक धाव दिली. नुरुल हसन फलंदाजीसाठी आला. त्याने दुसर्या चेंडूवर षटकार फटकावल्याने भारतीय फॅन्सला धडकी भरली. अर्शदीपने तिसर्या चेंडू निर्धाव टाकला.चाैथ्या चेंडूवर दाेन धावा मिळाल्या. पाचव्या चेंडूवर नुरुलने चाौकार लगावला. अखेरच्या चेंडूवर सात धावांची गरज हाेती. अखेरच्या चेंडूवर नुरुलने केवळ दाेन धावा काढल्या आणि भारताने पाच धावांनी सामना जिंकला.
पावसानंतर खेळ सुरू होताच भारताला मोठा ब्रेकथ्रू मिळाला. आठव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर केएल राहुलने थेट थ्रोवर लिटन दासला धावबाद केले. लिटनने 27 चेंडूत 60 धावा केल्या. बाद झाल्यानंतर शकीब अल हसन क्रीजवर आला. यावेळी बांगलादेशची धावसंख्या आठ षटकांत एका विकेटच्या मोबदल्यात 74 होती. मोहम्मद शमीने बांगलादेशला दुसरा धक्का दिला. त्याने 10व्या षटकातील पहिल्या चेंडूवर नजमुल हुसेन शांतोला बाद केले. शांतोने 25 चेंडूत 21 धावा केल्या. सूर्यकुमार यादवने त्याचा झेल पकडला.
अर्शदीप सिंगने बांगलादेशला तिसरा धक्का दिला. त्याने 12व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अफिफ हुसेनला सूर्यकुमार यादव करवी त्याला झेलबाद केले. ऑफिफने पाच चेंडूत तीन धावा केल्या. याच षटकात अर्शदीपने बांगलादेश संघाला मोठा झटका दिला. त्याने पाचव्या चेंडूवर शकिब अल हसनला माघारी धाडले. षटकार मारण्याच्या प्रयत्नात शाकिबला दीपक हुडाने झेलबाद केले. शाकीबने 12 चेंडूत 13 धावा केल्या. यावेळी बांगलादेशची धावसंख्या 12 षटकांत 4 बाद 101 होती.
हार्दिकने 13 व्या षटकाच्या दुस-या चेंदूवर यासिर अली आणि पाचव्या चेंडूवर मोसाद्देक हुसेनला बाद करून बांगलादेशला दुहेरी झटके दिले. यासिर अलीने तीन चेंडूत एक धाव काढली. त्याचा झेल अर्शदीप सिंगने पकदला. त्याच्यानंतर मोसाद्देक हुसेन तीन चेंडूत सहा धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. हार्दिकने त्याला क्लीन बोल्ड केले.
प्रत्युत्तरात, 185 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशने आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर लिटन दास आणि नजमुल हुसेन शांतो यांनी फटकेबाजीच्या जोरावर भारतीय गोलंदाजांवर दबाव टाकला. दुस-या षटकात लिटन दासने अर्शदीप सिंगला तीन चौकार लगावले. या षटकात बांगलादेशला 14 धावा मिळाल्या. त्यानंतरच्या तिस-या षटकात लिटनने भुवनेश्वर कुमारची धुलाई केली. त्याने एक षटकार आणि दोन चौकांरांच्या सहाय्याने या षटकात 16 धावा वसूल केल्या. 5 व्या षटकात लिटनने पुन्हा एकदा भुवनेश्वर कुमारवर आक्रमण केले. या षटकात त्याने एक षटकार ठोकून बांगलादेशची धावसंख्या 5 षटकात 44 वर नेली. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात लिटन दासने तुफानी खेळी केली. त्याने शमीच्या या षटकात पहिल्या चेंडूवर चौकार, दुस-या चेंडूवर षटकार, चौथ्या चेंडूवर चौकार मारले. या षटकात लिटने षटकार ठोकून 21 चेंडूत अर्धशतक फटकावले. 6 षटकात बांगलादेशच्या सलामीवीरांनी 16 धावा चोपल्या. यावेळी बांगलादेशची धावसंख्या 6 षटकात बिनबाद 60 होती. पण या षटकानंतर पावसामुळे काहीवेळ खेळ थांबवण्यात आला.
बांगलादेशने सात षटकांत 66 धावा केल्या होत्या. त्यामुळे डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ते भारतापेक्षा 17 धावांनी पुढे होते. येथून सामना झाला नसता तर बांगलादेश विजय निश्चित होता. अखेर पाऊस थांबला पण 4:30 वाजण्यापुढे षटके कापण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सामना पुन्हा 4.50 वाजता सुरू करण्यात आला. यावेळी बांगलादेशला विजयासाठी 16 षटकांत 151 धावांचे लक्ष्य देण्यात आले. त्यांनी सात षटकात बिनबाद 66 धावा केल्या होत्या. अशा स्थितीत त्यांना आता नऊ षटकांत आणखी 85 धावांची गरज होती. लिटन दास नाबाद 59 आणि नजमुल हसन शांतो सात धावांवर खेळत होते.
विराट कोहलीने 17 व्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले. या टी-20 विश्वचषकातील त्याचे हे तिसरे अर्धशतक आहे. तर टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 36 वे अर्धशतक आहे. तसेच तो T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. अर्धशतकानंतर दिनेश कार्तिक धावबाद झाला. कोहलीच्या चुकीच्या कॉलमुळे कार्तिक धावबाद झाला. कार्तिकने पाच चेंडूत सात धावा केल्या. टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा विराट कोहलीच्या बॅटमधून आल्या, त्याने 44 चेंडूत 64 धावांची खेळी केली. तर सलामीवीर राहुलने 50, तर सूर्यकुमार यादवने 30 धावांचे योगदान दिले. बांगलादेशच्या हसन महमूदने 3 तर शाकीब अल हसनने 2 विकेट घेतल्या.
भारताला 10 व्या षटकात दुसरा धक्का बसला. केएल राहुल अर्धशतक झळकावल्यानंतर लगेचच बाद झाला. त्याने 32 चेंडूत 50 धावा केल्या. राहुलने आपल्या खेळीत तीन चौकार आणि चार षटकार मारले. यावेळी विराट कोहली दुसऱ्या टोकाला 18 चेंडूत 23 धावांवर नाबाद होता. राहुलनंतर सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर उतरला. यावेळी भारताची धावसंख्या 9.2 षटकात 2 बाद 78 धावा होती.
पहिल्या तीन षटकांमध्ये भारताने सावध सुरुवात केली. भारताने तीन षटकाच्या खेळानंतर विनाबाद ११ धावा केल्या होत्या. तिसर्या षटकात तस्कीनच्या गोलंदाजीवर रोहित शर्माला जीवदान मिळाले. हसन महमूद यानेच रोहितला जीवदान दिले होते. मात्र चौथ्या षटकात त्याच्याच गोलंदाजीवर पाँइंटवर यासिर अलीने रोहितचा झेल पकडला. पाच षटकानंतर भारताने एक गडी गमावत ३० धावा केल्या आहेत.
आजच्या सामन्यात टीम इंडियात एक बदल करण्यात आला आहे. दीपक हुडाऐवजी अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे, अशी माहिती कर्णधार रोहित शर्माने दिली.
मागील सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेने पराभूत केले होते. त्यामुळे टीम इंडियाचे सेमीफायनलपर्यंत पोहचण्याचे समीकरण थोडे बिघडले आहे. मात्र आजचा विजय हा सेमीफायनलचा मार्ग सुकर करणारा ठरणार आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात सहा वर्षानंतर सामना होत आहे. २३ मार्च २०१६ रोजी टी-२० विश्वचषक स्पर्धेत झालेल्या सामना बांगलादेशनने केवळ एका धावावर जिंकला होता. या पराभवामुळे भारतीय संघावर स्पर्धेतूनच बाहेर पडण्याची नामुष्की ओढावली होती. त्यामुळे २०१६ मधील पराभवाची परतफेड म्हणूनही आजच्या सामन्याकडे पाहिले जात आहे.
भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर अश्विन, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंह
बांगलादेश संघ : शाकिब अल हसन (कर्णधार), नजमुल हुसैन शंटो, लिटन दास, अफिफ हुसैन, नूरुल हसन, मोसादेक हुसैन, यासिर अली, तस्कीन अहमद, मुस्तफिजुर रहमान, शोरिफुल इस्लाम, हसन महमूद.