Asaduddin Owaisi: टीम इंडियाने पाकविरुद्ध मैदानात उतरू नये, असदुद्दीन ओवेसींचा सामन्याला विरोध | पुढारी

Asaduddin Owaisi: टीम इंडियाने पाकविरुद्ध मैदानात उतरू नये, असदुद्दीन ओवेसींचा सामन्याला विरोध

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट मैदानावर महामुकाबला होणार आहे. मागच्या वर्षीच्या पराभवाची परतफेड करण्यासाठी रोहित ब्रिगेड सज्ज झाली आहे. त्यामुळे टी-20 विश्वचषक स्पर्धेचा थरार आज टीपेला पोहचणार यात शंका नाही. रविवारी (दि. 23) होणाऱ्या या सामन्याची दोन्ही देशातील क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र एआयएमआयएम (AIMIM)चे प्रमुख आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी या सामन्यावरून धक्कादायक विधान केले आहे. ऑस्ट्रेलियात खेळला जाणारा पाकिस्तानविरुद्धचा हा सामना भारतीय संघ का खेळत आहे, असा सवाल ओवेसी यांनी उपस्थित करून टीम इंडियाने हा सामना खेळू नये असे आवाहन केले आहे.

सध्या आशिया चषक 2023 स्पर्धेवरून भारत आणि पाकिस्तान क्रिकेट मंडळांमध्ये जोरदार वाद सुरू आहे. असे असताना ओवेसी (Asaduddin Owaisi) यांचे हे वक्तव्य समोर आले आहे. दरम्यान याच मुद्द्यावरून ओवेसींनी सध्याच्या विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘भारत पाकिस्तानसोबत ऑस्ट्रेलियात क्रिकेट का खेळतोय? बीसीसीआयने टीम इंडियाला पाकिस्तानमध्ये अशिया चषक 2023 खेळण्यासाठी न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मग ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानविरुद्धचा क्रिकेट सामना खेळण्यासाठी मैदान का उतरतोय? भारतीय संघाने हा सामना खेळू नये. एकीकडे भारतीय संघ पाकिस्तानात पाठवणार नाही असे म्हटले जाते, पण दूसरीकडे त्याच संघाविरुद्ध मात्र ऑस्ट्रेलियात सामना खेळायचा. हे कसले प्रेम आहे? अशी विचारणा त्यांनी अप्रत्यक्षरित्या केंद्र सरकारला केली आहे.

ओवेसी (Asaduddin Owaisi) पुढे म्हणाले, ‘पाकिस्तानशी खेळू नका. पाकिस्तानसोबत मॅच न खेळल्यास काय होईल? टेलिव्हिजनसाठी 2000 हजार कोटींचे नुकसान? पण, ही सामना काय भारता देशापेक्षा जास्त मोठा आहे का? असे प्रश्न उपस्थित करून हा सामना खेळू नका, असे आवाहन ओवेसी यांनी केले आहे. ते पुढे असेही म्हणाले की, विश्वचषस्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा हाय व्होल्टेज सामना कोण जिंकेल हे माहित नाही, पण भारतीय संघाने विजय मिळवावा हीच माझी इच्छा आहे. आणि संघालाही तशा मी शुभेच्छा देतो. या सामन्यात शमी आणि मोहम्मद सिराज सारखे आमचे गोकंदाज पाकिस्तानला चिरडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील, यात शंका नाही, असे ही त्यांनी व्यक्त केले.

टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर-12 टप्प्यातील सामने शनिवारपासून सुरू झाले आहेत. भारतीय संघ 23 ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर पाकिस्तान विरुद्ध सुपर-12 टप्प्यातील पहिला सामना खेळणार आहे. या स्पर्धेतील भारताच्या गटात पाकिस्तान, झिम्बाब्वे, नेदरलँड, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या संघांचा समावेश आहे.

Back to top button