T-20 World Cup : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड लढतीने वाजणार टी-20 वर्ल्डकपचा बिगुल

T-20 World Cup : ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड लढतीने वाजणार टी-20 वर्ल्डकपचा बिगुल
Published on
Updated on

ऑस्ट्रेलिया आज मायदेशात 2022 च्या टी-20 विश्वचषकाच्या (T-20 World Cup) सुपर-12 फेरीची सुरुवात आपला पारंपरिक शेजारी न्यूझीलंडविरुद्ध खेळून करत आहे. साधारण वर्षापूर्वी याचवेळी यूएईच्या काहीशा अपरिचित खेळपट्ट्या आणि उष्ण दमट वातावरण ऑस्ट्रेलियाला विश्वचषकाच्या विजेतेपदापासून रोखू शकले नाही. आता तर त्यांना घरच्या परिचित मैदानांवर खेळायचे आहे. घरच्या प्रेक्षकांचे अपेक्षांचे ओझे असण्यापेक्षा त्यांचा मैदानातील आवाजी पाठिंबा त्यांच्या पथ्यावर पडणार आहे.

ऑस्ट्रेलिया जरी नुकत्याच भारतात झालेल्या मालिकेत भारताविरुद्ध हरले असले तरी त्याचा परिणाम त्यांच्या विश्वचषकाच्या कामगिरीवर होणार नाही. याला कारण म्हणजे नुसतेच घरच्या मैदानावर खेळल्याचा फायदा नसेल तर अ‍ॅरोन फिंचचा संघ हा सर्व संघात परिपूर्ण संघ आहे. मुख्य म्हणजे ऑस्ट्रेलियाने संघ निवडीसाठी आपल्यासारखे प्रयोग न करता टीम डेव्हिडचा समावेश सोडला तर 2021 चा विजेता संघच जवळपास कायम ठेवला आहे.

विश्वचषकाचा इतिहास बघितला तर या जगज्जेत्या ऑस्ट्रेलिया संघाची टी-20 विश्वचषकातील वाटचाल अडखळतही झाली आहे. 2007 च्या स्पर्धेत त्यांना झिम्बाब्वेने, 2010 ला इंग्लंडने त्यांना अंतिम सामन्यात हरवले तर 2012 ला उपांत्य फेरीत हरले. 2014 आणि 2016 ला ते उपांत्य फेरीही गाठू शकले नाहीत. आजचा न्यूझीलंडविरुद्धचा सामना म्हणजे 2021 च्या विश्वचषक अंतिम सामन्याची पुनरावृत्ती आहे. न्यूझीलंडला आपल्या 2021 च्या पराभवाचा वचपा काढायची ही संधी आहे, पण केन विल्यम्सनला न्यूझीलंडची ऑस्ट्रेलियातील कामगिरी माहिती आहे. न्यूझीलंडकडे मॅचविनर आहेत, पण ज्यांच्याभोवती त्याची फलंदाजी आणि गोलंदाजी तयार होईल ते म्हणजे विल्यम्सन आणि ट्रेंट बोल्ट, फिन अ‍ॅलन, गुप्टील आणि कॉनवे यांच्यावर न्यूझीलंडची फलंदाजी अवलंबून असेल.

पिच रिपोर्ट (T-20 World Cup)

पावसाची शक्यता गृहीत धरून एससीजीची खेळपट्टी दोन दिवस झाकून ठेवण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार अ‍ॅरोन फिंचने एका बाजूने खेळपट्टी उघडून बघितली असता ती कोरडी असल्याचे जाणवले. जर मोठा पाऊस झाला तर आतून दव निर्माण होऊन खेळपट्टी ओलसर होईल. हवामान खात्याने येथे शनिवारी पावसाची शक्यता वर्तवली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news