युएईमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने संघाची घोषणा केली. सर्वजण संघ निवडीबाबत चर्चा करण्यात व्यस्त असतानाच बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी अजून एक मोठी घोषणा केली. त्यांनी यंदाच्या टी२० विश्वचषक स्पर्धेत संघाचा मेंटॉर म्हणून एम. एस. धोनी या नावाची घोषणा केली.
एम. एस. धोनी हे नाव ऐकल्या ऐकल्या भारतीय क्रिकेट चाहत्यांची कळी खुलली. कारण, टी२० विश्वचषक जिंकणाऱ्या पहिल्या संघाचे म्हणजेच भारताचे नेतृत्व केले होते. त्याच्या नावावर एकदिवसीय वर्ल्डकपही असल्याने त्याचा अनुभव आणि रणनीती भारतीय संघाला चांगलीच फलदायी ठरण्याची शक्यता आहे. धोनी टी२० विश्वचषकादरम्यान भारतीय संघाबरोबरच असणार आहे.
टी२० वर्ल्डकप सुरु होण्यापूर्वी युएईमध्ये आयपीएलचा उर्वरित १४ वा हंगाम होणार आहे. त्यासाठी सीएसकेचा कर्णधार असलेला धोनी तेथे उपस्थित असणारच आहे. याचबरोबर विविध देशातील अनेक खेळाडू आधी आयपीएल खेळून टी२० विश्वचषकाची जय्यत तयारी करणार आहे. यंदाचा टी२० वर्ल्डकप हा युएईमध्ये होणार असल्याने या स्पर्धेत फिरकी गोलंदाजांचा बोलबाला असणार आहे. याचीच छाप नुकत्याच झालेल्या टीम इंडियाच्या निवडीवरही दिसते.
दरम्यान, टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून अनुभवी रविचंद्रन अश्विनला संघात स्थान देण्यात आले आहे. तर, सलामीवीर शिखर धवनला संघातून वगळण्यात आले आहे. भारताचा माजी यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी हा संघाचा मेंटर असेल. इंग्लंडमध्ये चमक दाखविणाऱ्या शार्दूल ठाकूरला राखीव खेळाडूत स्थान मिळाले आहे.
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टिरक्षक) इशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह , भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी
राखीव : श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर, दीपक चाहर