शार्दुल ठाकूर म्हणजे सामान्य मुंबईकरांच्या संघर्षाचे प्रतिक

शार्दुल ठाकूर म्हणजे सामान्य मुंबईकरांच्या संघर्षाचे प्रतिक

भारताने ओव्हलवर पन्नास वर्षानंतर विजयाची चव चाखली. ही चव चाखण्यात मोठा वाटा रोहित शर्माचा आहे. तो या सामन्याचा हिरो देखील ठरला. मात्र या हिरोने सगळे श्रेय शार्दुल ठाकूरला दिले. एका अर्थी ते खरं देखील आहे. जरी रोहितची १२७ धावांची खेळी मोठी असली तरी. पहिल्या डावात अडखळलेल्या भारतीय फलंदाजीला सावरणारा होता तो शार्दुल ठाकूर. त्याने जर ती टीम इंडियाच्या फलंदाजांची लाज वाचवणारी ५७ धावांची खेळी केली नसती तर कदाचित सामन्याचे चित्र वेगळे असते.

बर त्याची ही खेळी म्हणजे लागलेली लॉटरी नव्हती. हे त्याने दुसऱ्या डावात पुन्हा ६० धावांची खेळी करुन सिद्ध करुन दाखवले. वर वरचे विश्लेषण केले तर इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात त्याने फक्त तीन विकेट घेतल्या असे दिसेल. मात्र त्या तीन विकेट कधी आणि कोणाच्या घेतल्या हे पाहिले तर त्याची किंमत आपल्याला कळेल. पहिल्या डावात शार्दुल ठाकूरने फक्त ऑली पोपची विकेट घेतली. मात्र हा तोच ऑली पोप होता त्याने ८१ धावांची चिवट खेळी करुन भारताला जेरीस आणले होते.

मोक्याच्या क्षणी ठाकूरने पाडले भगदाड

दुसऱ्या डावात शार्दुल ठाकूरने पुन्हा एकदा भागीदारी तोडण्याचे काम केले. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांचा नेटाने मुकाबला करणाऱ्या आणि सेट झालेल्या रोरी बर्न्सला त्याने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. त्यानंतरही भारताच्या हातात पूर्णपणे सामना आला नव्हता. कारण खेळपट्टीवर होता तो जो रुट. त्याने या मालिकेत पाठोपाठ तीन शतके ठोकत भारतीय गोलंदाजांना चांगलेच सतावले होते. मात्र पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी करुनही दुसऱ्या, तिसऱ्या कसोटीला मुकलेल्या शार्दुलने चौथ्या कसोटीत रुटला ३६ धावांवर बाद केले.

शार्दुलच्या या कामगीरीचे विश्लेषण दमदार कामगिरी असेच होते. मात्र सामनावीराची निवड करताना 'आकर्षक आकड्याअभावी' ती दमदार वाटत नाही. तसं शार्दुलच्या नावातच बॉलिवूडने दमदारपणा बहाल केलेले ठाकूर हे आडनाव असले तरी हा ठाकूर अत्यंत सामान्य आहे. म्हणूनच की काय पालघरसारख्या मध्यमवर्गीय भागात जन्मलेल्या शार्दुलच्या दमदार कामगिरीलाही दुय्यम स्थान मिळते.

लोकल बॉय शार्दुल

शार्दुल ठाकूरकडे नुसते पाहिले तरी मुंबईतल्या कोणत्यातरी लोकलच्या डब्ब्यात एका कोपऱ्यात उभा असलेला पंचवीशीतील तरुण आपल्या डोळ्यासमोर येतो. तसा शार्दुल हा मुंबईचा 'लोकल' बॉयच आहे. तो इतका लोकल आहे की त्याच्याकडे पाहिले तरी तो कोणत्याही एँगलने ग्लॅमरने भरलेल्या भारतीय क्रिकेट संघातील एक सदस्य आहे असे वाटत नाही. ना त्याच्या अंगावर ( बाह्य ) कोणताही टॅटू आहे ना त्याचे कपडे कधी डिझायनर पर्यायाने अतरंगी असल्याचे आढळून आले आहे. त्याचा वावर हा डोंबिवलीतल्या एका सामान्य मुंबईकरासारखाच असतो. जरी तो सातत्याने आयपीएल आणि भारतीय संघात दिसत असला तरी त्याच्या वागण्या बोलण्यात ना तो आयपीएलचा चकाकीपणा आलायं ना श्रीमंत बीसीसीआयच्या काँट्रॅक्ट प्लेअरची मिजासी आलेली आहे.

बर काहींचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. पण, शार्दुलचे तसे नाही अनेक वेळा आपण त्याला विदेशी दौऱ्यावरून आल्यानंतर आपल्या घरी जाण्यासाठी सामान्य मुंबईकरांसारखे लोकलचे धक्के खात जाताना पाहिले आहे. मुंबईतील सामान्य कुटुंबातील एखादा मुलगा क्रिकेटची स्वप्न उराशी बाळगतो त्यावेळीच मुंबईची लोकल त्याचा संघर्षाचा अविभाज्य घटक बनते. लोकल जिथे लोकांची प्रचंड गर्दी असते.

लोकमधून प्रवास करणाऱ्या लोकांना त्यांच्यामधील हवेच्या पोकळीचेही वावडे असते तेथे एक – दोन माणसांची जागा आडवणारी ती क्रिकेटची किटबॅग म्हणजे कहरचं की. ही किटबॅग घेऊन एखादा होतकरू क्रिकेटर लोकलची पायरी चढतो त्यावेळी लोक त्या मळलेल्या पांढऱ्या कपड्यातील इसमाकडे एलियनच्या नजरेतूनच पाहत असतात. दुसरीकडे पांढऱ्या कपड्यातील इसम हा आपली किटबॅग या लोकलच्या तोबा गर्दीत आपल्या प्रेयसीपेक्षाही जास्त जपत असतो. तो आपल्या या किटबॅगला गर्दी आणि त्या गर्दीतील रागीट नजरांपासून वाचवत असतो. असे हे मुंबईकर क्रिकेटरचे किटबॅग आणि लोकल रिलेशन असते.

शार्दुलच्या रक्तातील मुंबईकर

असा हा मुंबईकर क्रिकेटरच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असलेली लोकल तो खेळाडू मोठा झाला, नावाजलेला झाला की त्याच्या ग्लॅमरस आयुष्याच्या चौकटीत बसेनाशी होते. पण, शार्दुलच्या बाबतीत असे नाही. त्याला आंतरराष्ट्रीय फ्लाईटमधून उतरुन एखादी कॅब करण्यास काहीच अडचण नसते. पण, शार्दुल हा ठरला पक्का मुंबईकर त्याच्या नसानसात लोकल भिनली आहे. मुंबईकर वेळेच्या बाबतीत प्रचंड शिस्तबद्ध असतात. ते कोणती गोष्ट आपल्याला घरी लवकर पोहचवू शकते याचा विचार प्राधान्याने करत असतात. असाच विचार शार्दुलने केला असावा म्हणून तो आंतरराष्ट्रीय फ्लाईटमधून थेट लोकलच्या डब्ब्यात बसला आणि आपल्या घरी गेला.

हा झाला लोकलचा वेळ वाचवणारा किस्सा. असाच गाडीचाही एक किस्सा आहे. इंग्लंड ज्यावेळी भारत दौऱ्यावर आला होता त्यावेळी तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी त्याला भारतीय संघातून रिलीज केले. कारण काय तर मुंबई संघ विजय हजारे ट्रॉफीत खेळणार होता. शार्दुल ठाकूर मुंबई संघाला जयपूरमध्ये जॉईन होणार होता. सध्या बीसीसीआयच्या ज्या काही स्पर्धा सुरू आहेत किंवा होत्या त्या बायो बबलमध्ये होत आहेत. जर एका खेळाडूला एका बायो बबलमधून दुसऱ्या बायो बबलमध्ये जायचे असले तर त्याला तेथे थेट जावे लागणार आहे. या केसमध्ये शार्दुल ठाकूरने जर विमानाने जयपूरला जायचे ठरवले असते तर नियमाप्रमाणे त्याला क्वारंटाईन व्हावे लागेल असते. अशा परिस्थिीत त्याचे एक दोन सामने मिस झाले असते. पण, शार्दुल ठाकूरने मुंबईकडून थेट सामने खेळण्यासाठी अहमदाबाद ते जयपूर हा जवळपास ७०० किमीचा पल्ला बाय कार पार केला. त्यानंतर तो मुंबई संघात सहभागी झाला आणि त्याने पुढील सामने खेळले.

मुंबईकर अशीच विकेट फेकणार नाही : गावस्कर

शार्दुल ठाकूरने जर विमान प्रवासाचा कम्फर्ट स्वीकारला असता तर त्याला विजय हजारेच्या काही सामन्यांना मुकावे लागले असते. कोरोना काळात जरी त्याने असे केले असते तरी त्याच्या करिअरवर काहीच परिणाम झाला नसता. पण, शार्दुलने मुंबईकडून खेळण्यासाठी १० तासाचा गाडीचा अंग मोडून येणारा प्रवास केला.

नुकतेच शार्दुल ठाकूरची फलंदाजी पाहून दिग्गज मुंबईकर सुनिल गावस्कर यांनी एक वक्तव्य केले. ते म्हणाले की, मुंबईकर गोलंदाज तुम्हाला कधीही त्याची विकेट देणार नाही. तुम्हाला त्याची विकेट घ्यावी लागले. त्यांचे हे वक्तव्य म्हणजेच सामन्य मुंबईकरांच्या रोजच्या जगण्यातील एक संघर्षच आहे. सामन्य मुंबईकर नोकरीसाठी तास दोन तास प्रवास करेल. ते गर्दीचे धक्के खातही हो प्रसन्नतेने आपली नोकरी इमाने इतबारे करेल. मात्र या सर्व आव्हानात्मक परिस्थितीचा लवलेशही त्याच्या चेहऱ्यावर दिसणार नाही. तो झगडणे हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटकच मानून चालतो. त्यामुळे तो सहजासहजी हार मानत नाही. हेच शार्दुलनेही आपल्या खेळातून दाखवून दिले आहे.

शार्दुलची क्रिकेटबद्दलची कमिटमेंट नक्कीच आदर्शवत आहे. जे कोण लहान मुलांना भविष्यातील क्रिकेट खेळाडूंना प्रशिक्षण देत आहेत. त्यांनी ही सामान्य ठाकूरची गोष्ट त्या मुलांना सांगायला हवी. त्यांनीही समजायला हवे की टीव्हीवर दिसणारे 'स्टार' क्रिकेटर घडतात तरी कसे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news