जसप्रीत बुमराहला मिळणार विश्रांती? | पुढारी

जसप्रीत बुमराहला मिळणार विश्रांती?

मँचेस्टर ; वृत्तसंस्था : इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारत सध्या 2-1 ने आघाडीवर आहे. ओव्हलमध्ये झालेल्या चौथ्या कसोटीत भारताने 157 धावांनी विजय मिळविला होता. या विजयात सिंहाचा वाटा उचलताना वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दुसर्‍या डावात ओली पोप आणि जॉनी बेअरस्टो यांचे महत्त्वपूर्ण विकेटस् घेतली होती. मात्र, पाचव्या व शेवटच्या कसोटीत त्याला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता आहे.

कसोटी मालिकेत बुमराहने सर्वाधिक 151 षटके गोलंदाजी केली आहे. त्याने 21 च्या सरासरीने 18 विकेटस् घेतल्या आहेत. कसोटी मालिकेनंतर या वेगवान गोलंदाजाला आयपीएल आणि टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतही उतरावे लागणार आहे.

यामुळेच त्याला पाचव्या कसोटीत विश्रांती मिळण्याची शक्यता आहे. मात्र, 2007 नंतर भारताने इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकलेली नाही. यावेळी मात्र ही संधी चालून आली आहे. यामुळे पाचवी कसोटीसह मालिका जिंकण्याचा प्रयत्न विराट ब्रिगेड करणार आहे.

यामुळे खरोखरच बुमराहला विश्रांती देण्यात येते का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. चौथ्या कसोटीत शमी खेळू शकला नव्हता. अशा स्थितीत शमीला संधी देऊन बुमराहला विश्रांती देण्यात येऊ शकते. शमीने 3 सामन्यांत 11 विकेटस् घेतानाच लॉर्डस्वर महत्त्वपूर्ण 56 धावांची खेळीही केली होती.

कसोटी क्रमवारीत बुमराह नवव्या स्थानी

दुबई : वृत्तसंस्था : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ओव्हलमधील इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे एका स्थानाच्या फायद्यासह गोलंदाजांच्या आयसीसी कसोटी क्रमवारीत नवव्या स्थानी झेप घेतली. जसप्रीत बुमराहने आपल्या रिव्हर्स स्विंगने ओली पोपे आणि जॉनी बेअरस्टो यांना बाद करीत सामना भारताच्या बाजूने झुकवला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स अव्वल स्थानी आहे. भारतीय स्पिनर आर. अश्विन दुसर्‍या स्थानी कायम आहे. अश्विनला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत अजून एकही सामना खेळण्यास मिळाला नाही. शार्दुल ठाकूर दोन अर्धशतकांच्या मदतीने फलंदाजांच्या क्रमवारीत 79 व्या स्थानी पोहोचला आहे. तर, गोलंदाजांच्या क्रमवारीत तो 49 व्या स्थानी पोहोचला आहे.

फलंदाजीत रोहित पाचव्या स्थानी

फलंदाजी क्रमवारीत अव्वल 10 क्रमवारीत बदल झालेला नाही. या क्रमवारीत इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट अव्वल स्थानी कायम आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानी आहेत.

रहाणेबाबत संभ्रमावस्था

टीम इंडियाचा उपकर्णधार रहाणेची बॅट या मालिकेत तळपलेली नाही. यामुळे त्याच्या संघातील समावेशावरून प्रश्न विचारण्यात येत आहेत. त्याने 4 सामन्यांत केवळ 109 धावा जमविल्या आहेत. तसे पाहिल्यास शार्दुलने (2 सामन्यांत 2 अर्धशतकांसह 117 धावा) रहाणेपेक्षा जास्त धावांचे योगदान दिले आहे. यामुळे पाचव्या कसोटीत रहाणेऐवजी सूर्यकुमार यादवलाही संधी मिळू शकते. सूर्यकुमारने वन-डे आणि टी-20 मध्ये चांगली कामगिरी केली आहे.

अश्विनला मिळणार संधी?

भारतीय संघातील अनुभवी ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनला कसोटी मालिकेत अद्याप संधी मिळालेली नाही. पहिल्या चार कसोटीत डावखुर्‍या जडेजालाच मैदानावर उतरवण्यात आले होतेे. त्याने चार सामन्यांत 45 च्या सरासरीने केवळ 6 विकेटस् घेतल्या आहेत.

मात्र, त्याने फलंदाजीत कमाल करताना 23 च्या सरासरीने 160 धावांचे योगदान दिले आहे. दरम्यान, इंग्लंडने पाचव्या कसोटीसाठी जॅक लीचला संधी दिली आहे. त्याला मोईन अलीच्या स्थानावर अंतिम अकरात संधी मिळण्याची शक्यता आहे.

Back to top button