‘बीसीसीआय’च्या खजिन्याची चावी आशिष शेलार यांच्या हाती? | पुढारी

‘बीसीसीआय’च्या खजिन्याची चावी आशिष शेलार यांच्या हाती?

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) पदाधिकारी बदलाच्या हालचालींना वेग आला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. 11) ‘बीसीसीआय’ची मुंबईत एक बैठक पार पडली. या बैठकीत भारताचे माजी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब झाल्याचे समजत आहे. तर सध्याचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर (आयसीसी) पाठवण्यात येणार आहे. खजिनदारपदासाठी आशिष शेलार यांचे नाव पुढे आले आहे.

मुंबईतील ट्रायडंट हॉटेल येथे ‘बीसीसीआय’ची बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यात आले. तसेच 18 ऑक्टोबर रोजी होणार्‍या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यावेळी चर्चा करण्यात आली.

रॉजर बिन्नी ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष, तर राजीव शुक्ला यांच्याकडे उपाध्यक्षपदाची जबाबदारी असेल. जय शहा हे सचिवपदी कायम असणार आहेत. सौरभ गांगुलींना ‘आयसीसी’वर पाठवण्याची हालचाल सुरू आहे. सध्याचे ‘बीसीसीआय’ खजिनदार अरुण धुम्मल यांची ‘आयपीएल’ चेअरमनपदी, तर त्यांच्या जागी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

Back to top button