IND vs SA : संजू धैर्याने लढला, पण सामना गमावला

लखनौ, वृत्तसंस्था : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 9 धावांनी विजय मिळवला. 250 धावांचे आव्हान पेलताना टॉपचे फलंदाज एकामागून एक बाद झाले. 4 बाद 51 अशा परिस्थितीतून संजू सॅमसनने श्रेयस अय्यर (50) आणि शार्दुल ठाकूर (33) यांच्या मदतीने विजय खेचून आणण्याचा प्रयत्न केला, पण शार्दुल बाद होताच लक्ष्य अवघड होत गेले. तबरेज शम्सीच्या शेवटच्या षटकांत विजयासाठी 30 धावा करण्याचे संजूपुढे आव्हान होते, संजूने प्रयत्नाची पराकाष्ठा केली, परंतु त्याला 20 धावांच करता आल्या. तो 86 (63 चेंडू) धावांवर नाबाद राहिला. भारताने सामना गमावला असला तरी लढवय्या संजू मात्र चाहत्यांचे मन जिंकून गेला.
पावसामुळे उशिरा सुरू झालेला सामना 40 षटकांचा करण्यात आला. नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधार शिखर धवनने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 250 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात टीम इंडियाला 40 षटकांत 8 विकेटस् गमावत 240 धावाच करता आल्या.
दक्षिण आफ्रिकन गोलंदाजांनी खेळपट्टीचा फायदा घेत टिच्चून गोलंदाजी केली त्यामुळे 18 व्या षटकांत भारताने पहिले चार गमावत अवघ्या 51 धावा केल्या होत्या, पण श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन यांनी डाव सावरला; परंतु अर्धशतकानंतर श्रेयसही साथ सोडून गेला. श्रेयसने 37 चेंडूंत 50 धावांची खेळी खेळली, यासह भारताची धावसंख्या पाच विकेटस्वर 118 अशी झाली. भारताला यावेळी 80 चेंडूंत 132 धावांची गरज होती. यावेळी भारताला मोठा पराभव स्वीकारावा लागणार असे वाटत होते; परंतु शार्दुल ठाकूरने संजूला तितकीच तोलामोलाची साथ दिली. (IND vs SA)
पण अप्रतिम खेळी खेळल्यानंतर 38 व्या षटकात शार्दुल ठाकूर मोठा शॉट खेळून बाद झाला. त्याने 31 चेंडूंत 33 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. संजू सॅमसनसोबत 90 धावांची भागीदारी केली. यावेळी भारताला विजयासाठी 15 चेंडूंत 39 धावांची गरज होती. कुलदीप यादव (0), आवेश खान (0) हेही पाठोपाठ बाद झाले. 39 व्या षटकांत फक्त 7 धावा आल्या. त्यामुळे शेवटच्या षटकांत विजयासाठी 30 धावांचे टार्गेट उरले होते. यात संजू सॅमसन 20 धावांच करू शकल.
तत्पूर्वी, भारतीय कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात ऋतुराज गायकवाड आणि रवी बिश्नोईला वन-डेमध्ये पदार्पण करण्याची संधीही मिळाली आहे. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात संथ झाली. त्यांच्या 5 षटकांनंतर 18 धावा झाल्या. दक्षिण आफ्रिकेला 13 व्या षटकात 49 धावांवर पहिला धक्का बसला. शार्दुल ठाकूरने मलानला श्रेयस अय्यरकडून झेलबाद केले.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवुमाने 12 चेंडूंत आठ धावा केल्या, शार्दुल ठाकूरने त्याला क्लीन बोल्ड केले. यावेळी दक्षिण आफ्रिकेने 15 षटकांत 2 बाद 70 धावा केल्या होत्या. कुलदीप यादवने एडन मार्करामला खातेही उघडू न देता क्लीन बोल्ड केले. त्यापाठोपाठ रवी बिश्नोईने दक्षिण आफ्रिकेला चौथा धक्का दिला आहे. क्विंटन डिकॉक 48 धावांवर पायचित झाला. चार गडी बाद झाल्यानंतर हेन्रिक क्लासेन आणि डेव्हिड मिलर यांनी पाचव्या विकेटसाठी 139 धावांची केली. 40 षटकांनंतर क्लासेन (74) तर मिलर (75) नाबाद राहिले.