IND vs SA: रोहित शर्मासोबत ‘हा’ स्फोटक फलंदाज येणार ओपनिंगला! | पुढारी

IND vs SA: रोहित शर्मासोबत ‘हा’ स्फोटक फलंदाज येणार ओपनिंगला!

पुढारी ऑनलाईन डेस्क : टी 20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी टीम इंडिया आज (दि. 4) शेवटचा टी 20 सामना खेळणार आहे. आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने याआधीच दोन्ही सामने जिंकून मालिका खिशात टाकली आहे. पण भारतीय संघ आजचा सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेला क्लिन स्विप देण्याच्या आत्मविश्वासाने मैदानात उतरेल. दुसरीकडे, द. आफ्रिकेच्या संघाला मालिकेतील किमान एक सामना जिंकायचा आहे, जेणेकरून क्लीन स्वीप होऊ नये. दरम्यान, आज टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही मोठे बदल पाहायला मिळणार आहेत.

विराट कोहली आणि केएल राहुल यांना विश्रांती मिळू शकते

इंदोरच्या होळकर स्टेडियमवर आज भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात सामना रंगणार आहे. टीम इंडियाला प्रयोग करण्याची शेवटची संधी असेल. 23 ऑक्टोबर रोजी टी 20 विश्वचषकात पहिला सामना खेळण्यापूर्वी भारतीय संघाला दोन सराव सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. आजच्या सामन्यात विराट कोहली खेळणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. तो मुंबईत पोहोचल्याचे बोलले जात आहे. इंदोरहून संपूर्ण संघ प्रथम मुंबईला पोहोचेल आणि तेथून थेट ऑस्ट्रेलियाला रवाना होईल. विराट कोहली मुंबईतच संघातशी जोडला जाणार आहे. आजच्या सामन्यात विराट कोहलीशिवाय केएल राहुललाही विश्रांती दिली जाऊ शकते अशी बातमी आहे. विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यरचा भारतीय संघात समावेश केला जाऊ शकतो, पण केएल राहुलला विश्रांती दिल्यास कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीची जबाबदारी कोण घेईल, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.

ऋषभ पंत रोहित शर्मासोबत ओपनिंगला येण्याची शक्यता…

कर्णधार रोहित शर्मा आजचा सामना खेळणार असल्याचे आतापर्यंत तरी समोर येत आहे. आता रोहित शर्मासोबत सलामीवीराची भूमिका कोण साकारणार हा प्रश्न आहे. संघ व्यवस्थापन ऋषभ पंतला सलामीवीर म्हणून मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. म्हणजेच नव्या सलामीच्या जोडीसह संघ मैदानात उतरणार आहे. याआधीही ऋषभ पंतने काही प्रसंगी सलामीवीर म्हणून फलंदाजी केली आहे. अगामी टी 20 विश्वचषक स्पर्धेत केएल राहुल आणि रोहित शर्मा ही भारताची सलामीची जोडी असेल, पण जर काही अडचण आल्यास किंवा एखादा खेळाडू जखमी झाल्यास ऋषभ पंत सलामीवीराची भूमिका बजावू शकतो. टीम इंडियासाठी चांगली गोष्ट ही असेल की भारताला लेफ्ट हँड आणि राईट हँड बॅट्समन्सचा पर्याय उपलब्ध होईल. नाणेफेकीच्या वेळी कर्णधार रोहित शर्मा संघात किती बदल करतो आणि कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला येतो हे पाहावे लागेल. (IND vs SA)

Back to top button