National Games 2022 : सायकलिंग, वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण | पुढारी

National Games 2022 : सायकलिंग, वेटलिफ्टिंगमध्ये सुवर्ण

अहमदाबाद, पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रकुल स्पर्धेतील सहभागी भारतीय संघाची सदस्य खेळाडू मयुरी लुटेने 36 व्या नॅशनल गेम्समध्ये (National Games 2022) दमदार कामगिरी करताना पदकांची हॅट्ट्रिक साजरी केली. तिने सोमवारी टीम स्प्रिंट प्रकारात महाराष्ट्राला किताबाचा बहुमान मिळवून दिला. आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट मयुरी लुटे, शशिकला आगाशे आणि आदिती डोंगरेने टीम स्प्रिंट प्रकारात सुवर्णपदक पटकावले. यासह महाराष्ट्राच्या नावे सायकलिंगमध्ये तिसर्‍या पदकाची नोंद झाली. सोमवारी थ्री लॅपच्या या इव्हेंटमध्ये महाराष्ट्र संघाने 503 गुणांची कमाई केली. यासह महाराष्ट्र संघ सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. यातून महाराष्ट्राच्या मयुरी लुटेला स्पर्धेत तिसरे पदक आपल्या नावे करता आले. तिच्या नावे वैयक्तिक दोन पदकांसह एका सांघिक पदकाचा समावेश आहे. तिने दोन ‘सुवर्ण’ आणि कांस्यपदक जिंकले आहेत.

वेटलिफ्टिंगमध्ये कोमलला ‘सुवर्ण’ (National Games 2022)

अहमदनगरची कोमल वाकळे हिने 87 किलो गटात सुवर्णपदक जिंकत वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्रासाठी सोनेरी कामगिरी केली. तिने स्नॅचमध्ये 116 किलो, तर क्लीन व जर्कमध्ये 116 किलो असे एकूण 210 किलो वजन उचलले. स्नॅचमध्ये ती दुसर्‍या स्थानावर होती; मात्र क्लीन व जर्कमध्ये तिने सर्वोत्तम कामगिरी करीत सुवर्णपदक खेचून आणले.

ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्समध्ये भोईरला सुवर्णपदक

बडोदा ः राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स स्पर्धेला सोमवारी सुरुवात झाली. ट्रॅम्पोलिन प्रकाराचा प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश करण्यात आलेला आहे. आदर्श भोईर याने सुवर्णपदक जिंकून पदक तालिकेत महाराष्ट्राची स्थिती अधिक भक्कम केली. या स्पर्धेत आदर्श भोईर याने 50.140 गुणांची कमाई करत सुवर्णपदक जिंकले. एसएससीबीच्या मनू मुरली याने 46.000 गुण घेत रौप्यपदक, तर गोव्याच्या अभिजित लोखंडेने 45.790 गुणांची कमाई करून कांस्यपदक जिंकले.

ईशा वाघमोडेला कांस्यपदक

तीन मीटर्स स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या ईशा वाघमोडे हिने कांस्यपदक पटकावत उल्लेखनीय कामगिरी केली. सोलापूरच्या या खेळाडूने आतापर्यंत शालेय, राष्ट्रीय, सबज्युनिअर व जुनिअर गटाच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्ये अनेक पदके मिळवली आहेत. सन 2016 मध्ये तिने श्रीलंकेत आयोजित करण्यात आलेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली होती.

महाराष्ट्राचे पुरुष व महिला संघ खो-खोमध्ये अंतिम फेरीत

महाराष्ट्राच्या महिला आणि पुरुष खो-खो संघांनी आपली शानदार कामगिरी सुरूच ठेवताना राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून सुवर्णपदक जिंकण्याच्या आशा पल्लवित केल्या आहेत. दोन्ही संघ अंतिम फेरीत दाखल झाल्यामुळे एक पदक तर निश्चित झाले आहे. परंतु, दोन्ही संघांनी स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजवले असल्याने दोन सुवर्णपदके जिंकण्याच्या आशा दोन्ही संघांना वाटत आहेत. दोन्ही गटातील अंतिम सामने मंगळवारी होणार आहेत.

महिला गटातील पहिल्या उपांत्य लढतीत महाराष्ट्र महिला खो-खो संघाने दिल्ली संघाचा एक डाव आणि 8 गुणांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. तर पुरुष गटातील उपांत्य लढतीत महाराष्ट्र संघाने कर्नाटक संघावर एक डाव आणि 4 गुणांनी (26-10) विजय नोंदवत अंतिम फेरी गाठली. महाराष्ट्राच्या अविनाश देसाई, प्रतीक वाईकर, लक्ष्मण गावस, अक्षय भामरे, निहार दुबळे, दिलराज सेनगर, रामजी कश्यप या खेळाडूंनी लक्षवेधक कामगिरी बजावत सामना गाजवला.

Back to top button