National Game २०२२ : वेटलिफ्टिंगमध्ये अनन्याला चौथे स्थान

National Game २०२२ : वेटलिफ्टिंगमध्ये अनन्याला चौथे स्थान
Published on
Updated on

अहमदाबाद; वृत्तसंस्था : वेटलिफ्टिंग (National Game २०२२) मधील ५५ किलो गटात महाराष्ट्राच्या अनन्या पाटील हिचे ब्रॉंझपदक केवळ एक किलोने हुकले. तर चेतना घोजगे व साक्षी मस्के यांना ४९ किलो गटात पदक मिळविण्यात अपयश आले. ५५ किलो गटात अनन्या हिने स्नॅच मध्ये ७५ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ९१ किलो असे एकूण १६६ किलो वजन उचलले. या वजनी गटात ब्रॉंझपदक मिळविणाऱ्या के.प्रमिला हिने १६७ किलो वजन उचलले. ‌

महिलांच्या ४९ किलो गटात महाराष्ट्राच्या खेळाडूंपुढे ऑलिंपिक रौप्यपदक विजेती सैखोम मीराबाई चानू व राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती संजिता चानू यांचे मोठे आव्हान होते. चेतना हिला पाचव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. तिने स्नॅच मध्ये ६७, ७० व ७३ किलो असे अनुक्रमे पहिल्या तीन संधीमध्ये वजन उचलले. क्लीन व जर्कमध्ये तिने ८३, ८७ व ८७ किलो असे अनुक्रमे तीन प्रयत्नांमध्ये वजन उचलले. साक्षी हिला क्लीन व जर्कमध्ये एकदाही वजन उचलता आले नाही त्यामुळे तिला क्रमांक मिळू शकला नाही. तिने स्नॅच मध्ये तीनही प्रयत्नांमध्ये प्रत्येकी ७८ किलो वजन उचलले होते. अपेक्षेनुसार या वजनी गटात मणिपूरच्या मीराबाई व संजिता यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य पदक पटकाविले.

ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंना पदकाची संधी (National Game २०२२)

प्रणव गुरव, जय शहा व किरण भोसले यांनी शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीसाठी पदकाच्या आशा कायम राखल्या. हे तीनही खेळाडू अंतिम फेरीसाठी पात्र ठरले आहेत. तिहेरी उडीत महाराष्ट्राच्या कृष्णा सिंग याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्याने १५.७६ मीटर्स पर्यंत उडी मारली. हातोडा फेकीत शंतनू उचले याने दहावा क्रमांक मिळविला त्याने ५८.१० मीटर्स पर्यंत हातोडा फेक केली. तर कार्तिक करकेरा याला पंधराशे मीटर धावण्याच्या शर्यतीत तेरावे स्थान मिळाले. त्याला हे अंतर पार करण्यास चार मिनिटे १३.७७ सेकंद वेळ लागला.

महिलांमध्ये डायंड्रॉ व्हॅलेदारेस हिने याच क्रीडा प्रकारात अंतिम फेरीकडे वाटचाल केली. ऐश्वर्या मिश्रा हिने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.

प्रणव याने १०० मीटर धावण्याचे अंतर १०.६३ सेकंदात पार केले. भोसले याने हे अंतर १०.५३ सेकंदात पूर्ण केले. तर जय शहा याने ही शर्यत १०.८१ सेकंदात पूर्ण केली.

व्हॅलेदारेस हिने महिलांची १०० मीटर धावण्याची शर्यत ११.५७ सेकंदात पूर्ण केली. मिश्रा हिने ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत ५२.५० सेकंद वेळ नोंदविली.

टेनिसमध्ये महाराष्ट्राला दुहेरी मुकुटाची संधी

महाराष्ट्र टेनिसच्या पुरुष व महिला या दोन्ही गटात अंतिम फेरीत स्थान मिळाले आणि दुहेरी मुकुटाची संधी निर्माण केली. महाराष्ट्राने पुरुषांच्या उपांत्य फेरीत कर्नाटक विरुद्ध २-१ असा विजय मिळविला. महाराष्ट्राकडून चौदा वर्षीय खेळाडू मानस धामणे याने या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. त्याने आदित कल्याणपूर याच्यावर ३-६,६-२,६-४ असा आश्चर्यजनक विजय मिळविला. पहिला सेट गमावल्यानंतर त्याने संयमपूर्ण खेळाचा प्रत्येक घडवीत विजयश्री खेचून आणली. एकेरीच्या अन्य लढतीत महाराष्ट्राच्या अर्जुन कढे याला कर्नाटकच्या प्रज्वल देव याने ६-२, ७-६(९-७) असे पराभूत केले. मात्र दुहेरीत कढे याने अन्वित बेंद्रे याच्या साथीत देव व कल्याणपूर यांचा ४-६,६-३,६-१ असा पराभव करीत महाराष्ट्राला २-१ असा विजय मिळवून दिला.

महाराष्ट्राच्या महिलांनी सातत्यपूर्ण कामगिरी ठेवताना उपांत्य फेरीत तामिळनाडूचा २-० असा पराभव केला. त्यावेळी एकेरीच्या पहिल्या लढतीत वैष्णवी आडकर हिने लक्ष्मीप्रभा हिच्यावर ६-१, ४-६, ६-३ अशी मात केली. तर ऋतुजा भोसले हिने साई समिथा हिचा ६-३,६-२ असा सरळ दोन सेट्स मध्ये पराभव केला. अंतिम फेरीत महाराष्ट्राची यजमान गुजरात संघाबरोबर लढत होणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news