IND vs SA : वर्ल्डकपआधीची पूर्व परीक्षा आजपासून, भारत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार | पुढारी

IND vs SA : वर्ल्डकपआधीची पूर्व परीक्षा आजपासून, भारत दक्षिण आफ्रिकेशी भिडणार

तिरुअनंतपूरम, वृत्तसंस्था : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्या भारत दौर्‍यातील मालिकेला तिरुअनंतपूरम येथून सुरुवात होणार असून भारतीय संघ बुधवारपासून दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी घरच्या मैदानावर दोन टी-20 मालिका खेळायच्या होत्या. त्यातील ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने 2-1 असा विजय मिळवला असून गेल्या काही महिन्यांत एकदाही न हरलेल्या आफ्रिकेशी भारत भिडणार आहे. बीसीसीआयने 23 ऑक्टोबरपासून सुरू होणार्‍या विश्वचषकाला समोर ठेवून हा दौरा आखला आहे.

दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची टी-20 आणि एकदिवसीय मालिका होणार आहे. एकदिवसीय मालिका 6 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय संघाची ही शेवटची द्विपक्षीय मालिका असणार आहे.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील चार महिन्यांतील ही दुसरी टी-20 मालिका आहे. या वर्षी जूनमध्ये आफ्रिकन संघ पाच सामने खेळण्यासाठी भारतात आला होता. त्यानंतर मालिका 2-2 अशी बरोबरीत संपली होती. एका सामन्यात निकाल लागला नाही. दोन्ही संघांमधील मागील दोन मालिका अनिर्णीत राहिल्या हा योगायोग म्हणावा लागेल. या वर्षी जूनपूर्वी सप्टेंबर 2019 मध्ये भारतातील तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत होती.

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू दीपक हुड्डा दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. त्याच्या जागी श्रेयस अय्यरला संधी मिळाली आहे. कोणत्याही खेळपट्टीवर धावा काढण्याची क्षमता त्याच्यात आहे. त्याच्यासोबतची खास गोष्ट म्हणजे तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. याआधीही त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने स्वबळावर जिंकले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत श्रेयस अय्यरला याआधी स्टँडबाय खेळाडूंमध्ये ठेवण्यात आले होते.

संघ यातून निवडणार : (IND vs SA)

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर. अश्विन, यजुवेंद्र चहल, अक्षर पटेल, शाहबाज अहमद अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह.

दक्षिण आफ्रिका : टेंबा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्खिया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, रॅसी व्हॅन डर डुसेन, मार्को यानसेन, तबरेज शम्सी.

टी-20 मालिका

पहिला टी-20 : 28 सप्टेंबर, तिरुअनंतपूरम, संध्या. 7.30 वा.

दुसरा टी-20 : 2 ऑक्टोबर, गुवाहाटी, संध्याकाळी 7.30 वा.

तिसरा टी-20 : 4 ऑक्टोबर, इंदौर, संध्याकाळी 7.30 वा.
थेट प्रक्षेपण – स्टार स्पोर्टस् व हॉटस्टार

Back to top button