दिनेश कार्तिक इन पंत आऊट; विश्वचषकासाठी काय आहे रोहितचा डाव | पुढारी

दिनेश कार्तिक इन पंत आऊट; विश्वचषकासाठी काय आहे रोहितचा डाव

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने ०-१ अशा पिछाडीवरून ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली. रोहित शर्माने पूर्णवेळ कर्णधारपद हाती घेतल्यानंतर भारताचा हा नववा मालिका विजय ठरला. जेव्हा टीम इंडियाने एखादी ट्रॉफी जिंकली तेव्हा ती ट्रॉफी संघातील सर्वात युवा खेळाडूकडे दिली जाते. पण टीम इंडिया ट्रॉफीसोबत त्यांचे फोटो सेशन करत असताना रोहितने विजयी ट्रॉफी संघातील एका सीनियर खेळाडूकडे दिली. आणि सर्वांच्या भुवया उंचवल्या.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी आपली रणनीती राबवण्यास सुरुवात केली आहे. रोहितला यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला फलंदाजी करण्यासाठी अधिक वेळ द्यायचा आहे. भारत प्लेइंग इलेव्हनमध्ये कार्तिक आणि ऋषभ पंत यांच्यापैकी एकाची निवड करत आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये संघ व्यवस्थापनाने दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांचा वेगवेगळ्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. आशिया चषकादरम्यान पंतला अधिक संधी दिली, तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत दिनेश कार्तिकला प्राधान्य देण्यात आले.

Image

ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-१ ने जिंकल्यानंतर कर्णधार रोहित म्हणाला, ‘मला विश्वचषकापूर्वी पंत आणि कार्तिक या दोघांना जास्तीत जास्त संधी द्यायची आहे. पण मला वाटले की दिनेश कार्तिकला फलंदाजीसाठी आणखी वेळ देण्याची गरज आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत कार्तिकला जास्त खेळण्याची संधी मिळाली नाही. त्याला या मालिकेत एकूण 8 चेंडू खेळण्याची संधी मिळाली परंतु ती पूरेशी नाही.

रोहित पुढे म्हणाला, ‘पंतलाही खेळासाठी वेळ हवा आहे पण माझ्यासाठी सातत्यपूर्ण फलंदाजी करणे महत्त्वाचे होते. भारताला आता २८ सप्टेंबरपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळायची आहे. रोहितने सांगितले की, या मालिकेत कार्तिक आणि पंत यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करणे परिस्थितीवर अवलंबून असेल. आपल्याला त्याची गोलंदाजी पाहावी लागेल आणि त्याच्या गोलंदाजीच्या क्रमवारीनुसार त्यांना चांगले हाताळू शकतील अशा फलंदाजांना संधी द्यावी लागणार आहे. परिस्थितीनुसार डाव्या हाताच्या फलंदाजाला मैदानात उतरवायचे असेल तर आम्ही ते करू. उजव्या हाताच्या फलंदाजाची गरज भासल्यास त्याला मैदानात उतरवले जाईल. पण आम्ही या सर्व खेळाडूंचा काळजीपूर्वक वापर करणार आहाेत.

Back to top button