माझ्या विनंतीवरून कपिलदेव निवृत्त : अंशुमन गायकवाड | पुढारी

माझ्या विनंतीवरून कपिलदेव निवृत्त : अंशुमन गायकवाड

मुंबई; वृत्तसंस्था :  भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिलदेव यांनी माझ्या विनंतीला मान देऊन निवृत्तीची घोषणा केली असल्याचे त्यांनी म्हटले आहे, असा खुलासा माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांनी केला आहे.

लोकमान्य सेवा संघाने आयोजित केलेल्या गटस् आणि ग्लोरी क्रिकेट सन्मान संध्येत अंशुमन गायकवाड आणि उमेश कुलकर्णी या दिग्गजांना दिलीप वेंगसरकर आणि करसन घावरी या दिग्गजांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मुंबईत झालेल्या या कार्यक्रमात भारताचे माजी कसोटीपटू अंशुमन गायकवाड यांनी क्रिकेटबाबत काही खुलासे केले आहेत.

ते म्हणाले, भारताचा सर्वात यशस्वी खेळाडू कपिलदेवला त्याच्या निवृत्तीबाबत सांगणे आमच्यासमोर सर्वात मोठे आव्हान होते. तेव्हा मी निवड समितीचा अध्यक्ष होतो. सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम नोंदविल्यानंतर कपिलने निवृत्ती जाहीर करावी, असे सर्वांचे मत होते, पण पत्रकार परिषदेत कपिलने आणखी दोन वर्षे खेळणार असल्याचे जाहीर करताच आमच्या सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कपिलने आता थांबायला हवे, असे सर्वांना वाटत होते, पण त्याला हे सांगणार कोण? ही जबाबदारी सर्वांनी माझ्याच खांद्यावर टाकली, पण कपिलनेही एका महान खेळाडूप्रमाणे माझे ऐकले आणि सन्मानाने पुढच्याच सामन्यात निवृत्ती जाहीर केली, अशी आठवण अंशुमन गायकवाड यांनी सांगितली.

मॅचफिक्सिंग नाही; परंतु स्पॉट फिक्सिंग होते

मी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक असताना मॅचफिक्सिंगच्या अनेक बातम्या कानावर पडल्या. 1997 साली श्रीलंकेत असलेला निधास ट्रॉफीची फायनल फिक्स झालीय आणि भारत हरणार, असे धक्कादायक आणि निनावी फोनही आले, पण ती फायनल आपण जिंकलो. असे असले तरी मॅच फिक्सिंग होत नाही. होऊ शकत नाही, हे माझे ठाम मत आहे. पण स्पॉट फिक्सिंग तसेच वैयक्तिक फिक्सिंग नक्कीच होते, असेही त्यांनी म्हटले.

Back to top button