Team India : भारताचा T20 सामना संकटात, थकीत वीज बिलामुळे स्टेडियमची ‘बत्ती गुल’! | पुढारी

Team India : भारताचा T20 सामना संकटात, थकीत वीज बिलामुळे स्टेडियमची ‘बत्ती गुल’!

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघाने यावर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी सुरू केली आहे. या जागतिक स्पर्धेपूर्वी भारतीय संघाला ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिकेविरुद्ध तीन-तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळायची आहे. या दोन मालिका आणि वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, द. आफ्रिकेविरुद्ध सुरू होणा-या टी 20 मालिकेपूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे.

भारत आणि द. आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना 28 सप्टेंबर रोजी तिरुअनंतपुरममधील कार्यावट्टम येथील ग्रीनफील्ड स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हे स्टेडियम भारत विरुद्ध द. आफ्रिका यांच्यातील आंतरराष्ट्रीय सामन्याचे आयोजन करण्यासाठी सज्ज आहे. मात्र, सामन्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना केरळ स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड लिमिटेड (KSEBL)ने ग्रीनफील्ड स्टेडियम प्रशासनाला झटका दिला आहे. 2.36 कोटींची थकबाकी न भरल्याने वीज मंडळाने चक्क स्टेडियमचा वीजपुरवठा बंद केला आहे. त्यामुळे भारत-द. आफ्रिका सामना होणार की नाही यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.

वास्तविक, गेल्या तीन वर्षांपासून ग्रीनफिल्ड स्टेडियमने वीज बिल भरलेले नाही. यामुळे केएसईबीएलने थकबाकी भरण्याची मागणी केली आहे. अनेक वेळा ताकीद देऊनही थकबाकी भरली नसल्याचे वीज मंडळाचे म्हणणे आहे. अशातच केरळ जल प्राधिकरणाने थकबाकी न भरल्यास स्टेडियमला पाणी पुरवठा करणा-या जल वाहिन्या तोडण्याची धमकी दिली आहे. द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, केएसईबीएलच्या काझाकुट्टम विभागीय कार्यालयाने कार्यावट्टम ग्रीनफिल्ड स्टेडियममधील थकबाकी न भरल्यामुळे मागिल आठवड्यात मंगळवारी (दि. 13) फ्यूज काढल्या. त्यामुळे सामन्याच्या काही दिवस आधीच स्टेडियमचा विद्युत पुरवठा बंद झाला आहे. परिणामी स्टेडियम व्यवस्थापनाला भाड्याने घेतलेल्या जनरेटरच्या सहाय्याने देखभाल दुरुस्तीचे काम करावे लागत आहे.

राज्य सरकारच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, ग्रीनफिल्ड स्टेडियमसाठी केरळ स्पोर्ट्स फॅसिलिटी लिमिटेड जबाबदार आहे. ज्याने गेल्या तीन वर्षांत वीज आणि पाण्याचे बिल भरलेले नाही. तर केएसएफएल (KSFL)च्या मतानुसार, राज्य सरकारच्या वार्षिक निधीशिवाय वीज आणि पाणी बिलाची थकबाकी भरणे अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर केरळ क्रिकेट असोसिएशनने केएसएफएलला जबाबदार धरले आहे. केएसएफएलकडे तिरुअनंतपुरम कॉर्पोरेशनचे 2.85 कोटी रुपये कर थकीत आहेत. आता 28 सप्टेंबरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यावर परिणाम होऊ नये म्हणून हे संकट सोडवण्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढत आहे. या क्रिकेट सामन्याच्या तिकिटांची विक्री सोमवारपासून सुरू होण्याची शक्यता आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने राज्य सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

Back to top button