पुढारी ऑनलाईन डेस्क : Ausralia Tour of India 2022 : टी 20 विश्व वर्ल्ड कपपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात टी 20 मालिका खेळवली जाणार आहे. मात्र त्याआधीच ऑस्ट्रेलियन संघाला मोठा झटका बसला आहे. कांगारू संघाचे तीन खेळाडू मिचेल स्टार्क, मिचेल मार्श आणि मार्कस स्टॉइनिस हे दुखापतींमुळे संघाबाहेर पडले आहेत. तथापि, 22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपमधील न्यूझीलंडविरुद्ध सलामीच्या सामन्यासाठी हे सर्व खेळाडू तंदुरुस्त होतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. दुसरीकडे डेव्हिड वॉर्नरलाही विश्रांती देण्यात आली आहे, त्यामुळे भारताविरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघाला मोठा फटका बसू शकतो.
पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या आयसीसी टी 20 (ICC T20) वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी यजमान संघाला कोणताही धोका पत्करायचा नाही. यामुळेच स्टार्क, मार्श आणि स्टॉइनिस या तिन्ही खेळाडूंची दुखापत फारशी गंभीर नसली तरी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने त्यांना भारत दौऱ्यापासून दूर ठेवल्याची शक्यता आहे. सध्या कुठेतरी याचा फायदा टीम इंडियाला होऊ शकतो, असे क्रिकेट विश्लेषकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही जखमी खेळाडूंच्या जागी पर्यायी खेळाडूंची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज नॅथन एलिस, डॅनियल सॅम्स आणि सीन अॅबॉट यांचा 15 जणांच्या संघात समावेश करण्यात आला आहे. हे तीन खेळाडू तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेपूर्वी या आठवड्याच्या अखेरीस भारतात येणार आहेत. स्टॉइनिसला झालेल्या दुखापतीमुळे टीम डेव्हिडला ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, तर अनुभवी फलंदाज स्टीव्ह स्मिथला मिचेल मार्शच्या अनुपस्थितीत प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते.
भारत :
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग
ऑस्ट्रेलिया :
अॅरॉन फिंच (कर्णधार), जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, नॅथन एलिस, मॅथ्यू वेड, टीम डेव्हिड, जोश हेझलवूड, केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, पॅट कमिन्स, शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर.