Asia Cup 2022 : मला माफ करा… राजपक्षाचा झेल सोडल्याबद्दल शादाब खानने मागितली माफी | पुढारी

Asia Cup 2022 : मला माफ करा... राजपक्षाचा झेल सोडल्याबद्दल शादाब खानने मागितली माफी

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : आशिया चषकाच्या (Asia Cup 2022) अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करून सहाव्यांदा आशिया चषकावर नाव कोरले. किताबाच्या लढतीत झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानी संघाच्या शादाब खानने आपली चूक मान्य करून पराभवाची जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानच्या पराभवाला मीच जबाबदार असल्याचे शादाबने म्हटले आहे. शादाब ज्या कॅचबद्दल भाष्य करत आहे तो भानुका राजपक्षाचा होता, जो कॅच पाकला चांगलाच महागात पडला आणि राजपक्षा श्रीलंकेच्या विजयाचा हिरो ठरला.

अंतिम सामन्यात पुनरागमन करणार्‍या शादाब खानने ट्विट करून माफी मागितली आहे आणि कॅच मॅच जिंकवते, असे म्हटले आहे. माफ करा, मी या पराभवाची जबाबदारी घेतो. मी माझ्या संघाला नाराज केले. नसीम, हरिस रौफ, मोहम्मद नवाज आणि संपूर्ण गोलंदाजी शानदार होती. मोहम्मद रिझवानने जोरदार झुंज दिली. संपूर्ण संघाने आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला.

या विजयाबद्दल शादाबने श्रीलंकेच्या संघाचे अभिनंदन देखील केले आहे. खरे तर सुपर-4 च्या शेवटच्या सामन्यात शादाबला विश्रांती देण्यात आली होती, ज्या सामन्यात श्रीलंकेने 5 बळी राखून पाकिस्तानचा धुव्वा उडवला होता. फायनलच्या सामन्यात शादाबने 4 षटकांत 28 धावा देत साजेशी गोलंदाजी केली. त्यानंतर त्याला फलंदाजी करताना केवळ 8 धावा करता आल्या.

फायनलच्या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निराशाजनक सुरुवात केली. अवघ्या 58 धावांवर श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत परतला होता. मात्र, अखेरच्या 10 षटकांमध्ये श्रीलंकेने धावांचा डोंगर उभारला आणि पाकिस्तानसमोर विजयासाठी 171 धावांचे तगडे लक्ष्य ठेवले. अखेरच्या 10 षटकांमध्ये वनिंदू हसरंगा आणि भानुका राजपक्षा यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरू केली. राजपक्षाने 45 चेंडूंत 6 चौकार व 3 षटकारांसह नाबाद 71 धावा केल्या.

आमचे क्षेत्ररक्षण चांगले नव्हते : बाबर आझम (Asia Cup 2022)

दुबई ; वृत्तसंस्था : अंतिम सामन्यात आम्ही आमच्या क्षमतेनुसार फलंदाजी केली नाही. आम्ही सामन्याची सुरुवात चांगली केली, मात्र 15 ते 20 अतिरिक्त धावा दिल्या. त्यानंतर सामना नीट संपवू शकलो नाही. आमचे क्षेत्ररक्षण चांगले नव्हते, अशी प्रतिक्रिया सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने दिली आहे.

या सामन्यात आमच्या चुकांचे प्रमाण कमी होते. मात्र, आमचे क्षेत्ररक्षण चांगले नव्हते. फलंदाजही निर्धारीत लक्ष्य गाठू शकले नाहीत. मात्र, रिझवान, नईम आणि नवाझ हे चांगले खेळले. सामन्यांमध्ये चढ-उतार सुरूच असतात. जेवढ्या कमी चुका आम्ही करू, तेवढे आमच्या संघासाठी चांगले असेल, असे बाबर म्हणाला आहे. भानुका राजपक्षा 46 धावांवर असताना शादाबने त्याचा झेल सोडला होता. पुढे राजपक्षाने दमदार 71 धावांची खेळी केली आणि श्रीलंकेने आशिया चषक जिंकला. पाकिस्तानला या एका चुकीची किंमत सामना गमावून चुकवावी लागली.

Back to top button