ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी शुभमन गिल, त्रिपाठी, कृष्णाला संधी मिळणार? | पुढारी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी शुभमन गिल, त्रिपाठी, कृष्णाला संधी मिळणार?

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : येत्या 20 सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारताने अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. ऑस्ट्रेलियासारखा बलाढ्य संघ आणि आगामी टी-20 विश्वचषक स्पर्धा लक्षात घेता, त्याद़ृष्टीने भारतीय संघाची निवड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघात महत्त्वाच्या खेळाडूंसह आणखी नव्या चेहर्‍यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. आशिया चषकातील अपयशानंतर काही खेळाडूंना बॅकअपसाठी तयार करण्यात येणार असून शुभमन गिल, राहुल त्रिपाठी आणि प्रसिद्ध कृष्णा यांचा ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी संघात समावेश होऊ शकतो.

शुभमन गिल : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 मालिकेत शुभमन गिल आपले टी-20 पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्याने यापूर्वी एकदिवसीय संघामध्ये पदार्पण केले आहे. अलीकडेच झालेल्या वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्याची निवड करण्यात आली होती. यावेळी त्याने काही चांगल्या खेळीही केल्या आहेत. त्याने 9 एकदिवसीय सामने खेळले असून त्याने 1 शतक आणि 3 अर्धशतकांसह 71.29 च्या सरासरीने 499 धावा केल्या आहेत.

राहुल त्रिपाठी : आयपीएल 2022 मध्ये केलेल्या प्रभावी कामगिरीच्या जोरावर राहुल त्रिपाठीने भारतीय टी-20 संघात स्थान मिळवले होते. अलीकडच्या काळात झालेल्या काही टी-20 मालिकेतही त्याचा सहभाग होता. मात्र, त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळाले नव्हते. त्यामुळे त्याला आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणार्‍या टी-20 मालिकेसाठी पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

प्रसिद्ध कृष्णा : प्रसिद्ध कृष्णाने गेल्या वर्षी भारतीय एकदिवसीय संघात पदार्पण केले होते. त्याने आतापर्यंत 14 एकदिवसीय सामने खेळले असून 23.92 च्या सरासरीने 25 बळी घेतले आहेत. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या मालिकेत जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल हे दोघेही खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यांच्या अनुपस्थितीत प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यालाही टी-20 संघात पदार्पण करण्याची संधी आहे.

Back to top button