Asia Cup 2022 : ही दोस्ती तुटायची नाय… भारतीय-अफगाणी प्रेक्षकांचा दोस्ताना | पुढारी

Asia Cup 2022 : ही दोस्ती तुटायची नाय... भारतीय-अफगाणी प्रेक्षकांचा दोस्ताना

दुबई ; वृत्तसंस्था : आशिया कपमध्ये (Asia Cup 2022) सुपर-4 सामन्यात टीम इंडियाला पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते. यानंतर टीम इंडिया आशिया कपमधून बाहेर पडली. टीम इंडियाने आशिया कप 2022 च्या त्यांच्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानचा 101 धावांनी पराभव केला होता. मात्र, या सामन्यादरम्यानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भारत आणि अफगाणिस्तानचे चाहते एकमेकांना मिठी मारून भारत आणि अफगाणिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत आहेत. पाकिस्तानच्या प्रेक्षकांना चोप देणारे अफगाणी प्रेक्षक भारतीयांना मात्र बंधुप्रेमाने मिठ्या मारत होते.

भारत आणि अफगाणिस्तान झिंदाबादच्या घोषणा

अफगाणिस्तानमधील एका ट्विटर युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भारत आणि अफगाणिस्तानचे चाहते एकमेकांना मिठी मारत आहेत. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हबीब खान नावाच्या एका ट्विटर युजरने व्हिडीओ शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, अफगाणिस्तान आणि भारत सामन्यादरम्यान दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये बंधुभाव होता. यासोबतच दोन्ही देशांच्या चाहत्यांना मिठी मारल्यानंतर ते भारत झिंदाबाद आणि अफगाणिस्तान झिंदाबादच्या घोषणा देताना दिसत आहेत.

पाकिस्तान-आफगाणिस्तानच्या चाहत्यांमध्ये हाणामारी

भारत आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बुधवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे संघ आमनेसामने होते. या सामन्यादरम्यान दोन्ही संघांचे खेळाडू मैदानात भिडले. त्याचवेळी स्टँडमध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे चाहते आमनेसामने आले. भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ आशिया कप 2022 (Asia Cup 2022) च्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत.

 

Back to top button