Eng vs Ind 4th test 2nd day : दुसऱ्या डावात भारत नाबाद ४३; इंग्लंडकडे ५६ धावांची आघाडी | पुढारी

Eng vs Ind 4th test 2nd day : दुसऱ्या डावात भारत नाबाद ४३; इंग्लंडकडे ५६ धावांची आघाडी

पुढारी ऑनलाईन डेस्क : England vs India 4th test 2nd day : भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हल येथे खेळला जात असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या दिवशी इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावा केल्या असून, त्यांना पहिल्या डावात 99 धावांची आघाडी मिळाली आहे. घरच्या मैदानावर खेळणारा ओली पोपे (81) आणि पुनरागमन करणारा ख्रिस वोक्स (50) यांनी अर्धशतकी खेळी केल्यामुळे इंग्लंडला तीनशे धावांच्या जवळ पोहोचता आले. त्यानंतर भारताच्या रोहित शर्मा (20) आणि के. एल. राहुल (22) यांनी उरलेला दिवस खेळून काढीत बिनबाद 43 धावा केल्या.

भारतीय संघाने चौथ्या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी शुक्रवारी सकाळी दमदार सुरुवात केली. उमेश यादवने ओव्हरटर्नला (1) बाद करीत भारताला चौथे यश मिळवून दिले. डेव्हिड मलानलाही उमेश यादवने बाद करीत इंग्लंडला पाचवा हादरा दिला. त्यामुळे गुरुवारी नाबाद असलेली जोडी सकाळी 9 धावांत तंबूत परतली. भारतासाठी ही चांगली सुरुवात होती. परंतु, त्याचा फायदा मात्र त्यांना घेता आला नाही. ओली पोपे आणि जॉनी बेअरस्टो या दोघांनी संघाची पडझड उपहारापर्यंत थांबवली. या दोघांची शतकाकडे वाटचाल करीत असलेली भागीदारी मोहम्मद सिराजने मोडली. त्याने जॉनी बेअरस्टोला (37) पायचित केले. यानंतर पोपेच्या साथीला मोईन अली आला. दरम्यान, पोपेने 92 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले.

62व्या षटकात इंग्लंडने भारताची पहिल्या डावातील धावसंख्या ओलांडली. पोपेने मोईन अलीसोबतही अर्धशतकी भागीदारी उभारली. नवा चेंडू घेतल्यानंतर अली बाद झाला. फिरकीपटू रवींद्र जडेजाने त्याला 35 धावांवर रोहितकरवी झेलबाद केले. चहापानानंतर शतकाच्या जवळ पोहोचलेल्या ओली पोपेला शार्दुलने बाद केले. त्याने पोपेची 81 धावांवर दांडी गुल केली. पोपेने आपल्या खेळीत 6 चौकार ठोकले. पोपेनंतर इंग्लंडचा डाव लवकर आटोपणार असे वाटत होते; पण ख्रिस वोक्सने झुंजार खेळी करीत इंग्लंडची आघाडी वाढवली. वोक्सने 11 चौकारांसह अर्धशतकी खेळी केली. 50 धावांवर तो धावचित झाल्यामुळे 290 धावांवर इंग्लंडचा डाव संपुष्टात आला. भारताकडून उमेश यादवने सर्वाधिक तीन बळी घेतले, तर बुमराह आणि जडेजाने दोन-दोन बळी घेतले.

तत्पूर्वी, भारतीय फलंदाजांचे ‘ये रे माझ्या मागल्या…’ असे रडगाणे चौथ्या कसोटीतही दिसून आले. भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांमध्ये गुंडाळला. शार्दुल ठाकूरने केलेल्या आक्रमक फलंदाजीमुळे भारताला किमान सन्मानजनक धावसंख्या तरी उभारता आली. त्यानंतर भारताने इंग्लंडचे तीन फलंदाज 53 धावांत तंबूत पाठवले होते. उमेश यादवने ज्यो रूटचा त्रिफळा उडवून भारतासाठी मोठा दिलासा दिला होता.

धावफलक

भारत प. डाव : रोहित शर्मा झे बेअरस्टो गो. वोक्स 11, के. एल. राहुल पायचित गो. रॉबिन्सन 17, चेतेश्वर पुजारा झे. बेअरस्टो गो. अँडरसन 4, विराट कोहली झे. बेअरस्टो गो. रॉबिन्सन 50, रवींद्र जडेजा झे. रूट गो. वोक्स 10, अजिंक्य रहाणे झे. मोईन अली गो. ओव्हरटर्न 14, ऋषभ पंत झे मोईन अली गो. वोक्स 9, शार्दुल ठाकूर पायचित गो. वोक्स 57, उमेश यादव झे. बेअरस्टो गो. रॉबिन्सन 10, जसप्रीत बुमराह धावचित 0, मो. सिराज नाबाद 1. अवांतर 8, एकूण 61.3 षटकांत सर्वबाद 191 धावा.

गडी बाद क्रम : 1/28, 2/28, 3/39, 4/69, 5/105, 6/117, 7/127, 8/190, 9/190, 10/191.

गोलंदाजी : अँडरसन : 14-3-41-1, रॉबिन्सन : 17.3-9-38-3, वोक्स : 15-6-55-4, ओव्हरटर्न : 15-2-49-1.

इंग्लंड पहिला डाव : रॉरी बर्न्स त्रि. गो. बुमराह 5, हसीब हमीद झे. पंत गो बुमराह 0, ज्यो रूट त्रि. गो. उमेश यादव 21, डेव्हिड मलान झे. रोहित गो. उमेश 31, क्रेग ओव्हरटर्न झे. कोहली गो. उमेश 1, जॉनी बेअरस्टो पायचित गो. सिराज 37, ओली पोपे त्रि. गो. शार्दूल 81, मोईन अली झे. रोहित गो. जडेजा 35, ख्रिस वोक्स धावचित 50, रॉबिन्सन त्रि. गो. जडेजा 5, अँडरसन नाबाद 1.
अवांतर 23, एकूण : 84 षटकांत सर्वबाद 290.

गडी बाद क्रम : 1/5, 2/6, 3/52, 4/53, 5/62, 6/151, 7/222, 8/250, 9/255, 10/290.

गोलंदाजी : उमेश यादव : 19-2-76-3, बुमराह : 21-6-67-2, शार्दुल ठाकूर : 15-2-54-1, मो. सिराज : 12-4-42-1, जडेजा 17-1-36-2.

भारत दु. डाव : रोहित शर्मा खेळत आहे 20, के. एल. राहूल खेळत आहे 22. अवांतर 1, एकूण 16 षटकांत नाबाद 43 धावा.

गोलंदाजी : अँडरसन : 6-1-13-0, रॉबिन्सन : 4-0-21-0, वोक्स : 5-1-8-0, ओव्हरटर्न 1-0-1-0.

Back to top button