चेतेश्वर पुजारा म्हणतो, ‘हार्दिक पंड्या पाचवा गोलंदाज होऊ शकत नाही’ | पुढारी

चेतेश्वर पुजारा म्हणतो, ‘हार्दिक पंड्या पाचवा गोलंदाज होऊ शकत नाही’

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 फेरीतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारताचा पराभव झाला. गोलंदाजीत भारताकडे सहावा पर्याय नसणे हे संघाच्या पराभवाचे एक कारण मानले जात आहे. भारताने 181 धावा केल्या होत्या, पण अखेरच्या षटकात पाकिस्तानने सामना जिंकला. याबाबत टीम इंडियाच्या कसोटी संघातील खेळाडू चेतेश्वर पुजाराने संघ व्यवस्थापनाचा खरपूस समाचार घेतला आहे. हार्दिक पंड्या हा पाचवा गोलंदाज नसल्याचे त्याने म्हटले आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल आपले विचार शेअर करताना, कसोटी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराला म्हणाला की, संघ व्यवस्थापनाने हार्दिक पंड्यावर पूर्णपणे विसंबून राहण्याऐवजी अतिरिक्त गोलंदाजाची निवड करायला हवी होती. पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात सामनावीर ठरलेला अष्टपैलू खेळाडू रविवारी पूर्णपणे फ्लॉप ठरला. तो आपले खाते उघडू शकला नाही आणि गोलंदाजी करताना त्याने 4 षटकांत एक विकेट घेत 44 धावा दिल्या.

क्रिकइन्फोवर पुजारा म्हणाला, ‘हार्दिक चांगली गोलंदाजी करत आहे, पण आपण त्याला पाचवा गोलंदाज मानू शकत नाही. मला वाटते की प्रत्येक वेळी त्याच्याकडून चार षटकांची अपेक्षा करणे योग्य नाही. मात्र, आवेश खान आजारी असल्याने आमच्याकडे पुरेसे पर्याय नव्हते. भविष्यात संघात काही बदल होऊ शकतात आणि हार्दिकने सहावा गोलंदाज म्हणून खेळत राहिल्यास चांगले होईल’, असाही सल्ला त्याने दिला.

मोहम्मद नवाजला फलंदाजीच्या क्रमवारीत बढती देण्याच्या पाकिस्तानच्या रणनीतीचेही पुजाराने कौतुक केले. हा त्या सामन्यातील एक्स फॅक्टर असल्याचे त्याने सांगितले. रिझवान आणि नवाज यांनी संयुक्तपणे भारतीय गोलंदाजांची कोंडी केली. दोघांनी अवघ्या 35 चेंडूत 73 धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तानला धावांचा पाठलाग करणे सोपे झाले. नवाजने 20 चेंडूत 42 तर रिझवानने 51 चेंडूत 71 धावा केल्या.

Back to top button