Babar Azam vs Ehsan Khan : चार वर्षांनंतरही बाबर आझमसाठी एहसान खान ठरला कर्दनकाळ! | पुढारी

Babar Azam vs Ehsan Khan : चार वर्षांनंतरही बाबर आझमसाठी एहसान खान ठरला कर्दनकाळ!

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझमची बॅट थंड पडली आहे. हॉंगकॉंगविरुद्धच्या दुसऱ्या साखळी सामन्यातही तो धावा करू शकला नाही. हाँगकाँगचा फिरकी गोलंदाज एहसान खानने त्याला कॉट अँड बोल्ड केले. बाबरने या सामन्यात 8 चेंडूंचा सामना केला आणि एका चौकाराच्या मदतीने 9 धावा केल्या.

बाबर आझमसाठी एहसान खान पुन्हा एकदा मोठी समस्या असल्याचे सिद्ध झाले आहे. चार वर्षांनंतरही बाबर एहसानच्या गोलंदाजी समोर फेल गेला आहे. खरं तर, एहसान खानने 2018 साली आशिया कपमध्ये बाबर आझमला आपला बळी बनवले होते आणि चार वर्षानंतर त्याने पुन्हा एकदा आशिया कपमध्ये अप्रतिम कामगिरी करत बाबरचा बळी घेतला आहे. आशिया कप 2018 मधील सामन्यात सामन्यात बाबर आझम 33 धावांवर बाद झाला होता. एहसान खानने त्याला माघारी धाडले होते. मात्र पाकिस्तानने तो सामना जिंकला होता.

यंदाही पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमला साखळी सामन्यांमध्ये धावा करता आलेल्या नाहीत. भारताविरुद्धच्या पहिल्या साखळी सामन्यात तो अवघ्या 10 धावांवर बाद झाला होता, तर दुस-या साखळी सामन्यात हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात तो 9 धावा करू शकला.

Back to top button