Suryakumar Yadav Rcord : ‘किंग कोहली’च्या षटकारांचा विक्रम सूर्यकुमारने काढला मोडीत! | पुढारी

Suryakumar Yadav Rcord : ‘किंग कोहली’च्या षटकारांचा विक्रम सूर्यकुमारने काढला मोडीत!

पुढारी ऑनलाईन डेस्क : हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज सूर्यकुमार यादव जबरदस्त फॉर्ममध्ये होता. 14 व्या षटकात फलंदाजीला आलेल्या सूर्याने वादळी खेळू करून 26 चेंडूत 68 धावांची नाबाद खेळी साकारली. त्याच्या या शानदार खेळीमुळे भारतीय संघाने 192 धावांपर्यंत मजल मारली. ज्याचा संघाला फायदा झाला. कारण, प्रत्युत्तरात हाँगकाँगचा संघ केवळ 152 धावा करू शकला आणि त्यांचा 40 धावांनी पराभव झाला. या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेच्या पुढील फेरीत (सुपर फोर) प्रवेश केला आहे. (Suryakumar Yadav Rcord)

दरम्यान, झंझावाती खेळीच्या जोरावर सुर्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. आशिया चषकाच्या टी-20 सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तो पहिल्या क्रमांकावर आहे. याआधी आशिया चषकाच्या कोणत्याही टी-20 सामन्यात कोणत्याही भारतीय फलंदाजाने तीन पेक्षा जास्त षटकार मारले नव्हते, मात्र हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने सहा षटकार मारले. सर्व संघ एकत्र घेतल्यास सूर्यकुमार संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. त्याच्याआधी अफगाणिस्तानच्या नजीबुल्लानेही एका सामन्यात सहा षटकार मारले होते. (Suryakumar Yadav Rcord)

एका सामन्यात चौकार आणि षटकारांनी सर्वाधिक धावा…

आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक चौकार आणि षटकार मारण्याच्या बाबतीत सूर्यकुमार यादव भारतीयांमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. या सामन्यात त्याने एकूण 68 धावा केल्या. यापैकी 60 धावा चौकार आणि षटकारांच्या जोरावर आल्या. त्याच्या खेळीत 12 चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. बांगलादेशच्या सब्बीर रहमानने 2016 मध्ये एका डावात 13 वेळा चेंडू सीमापार पाठवले होते. सूर्यकुमार या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने 12 वेळा चेंडू सीमापार धाडले आहेत. श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 11 वेळा तर, रोहित आणि शिखर धवनने 2016 मध्ये एका डावात 10 चेंडू सीमापार धाडले होते. (Suryakumar Yadav Rcord)

सुर्याने विराटचा विक्रमही मोडला..

एका डावाच्या शेवटच्या पाच षटकांमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत सूर्यकुमार दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला. सूर्यकुमारने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या पाच षटकांत 53 धावा कुटल्या. तर विराटने 2016 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आणि 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटच्या पाच षटकांत 49 धावा वसूल केल्या होत्या. या बाबतीत युवराज सिंग अजूनही पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने 2007 मध्ये इंग्लंडविरुद्ध शेवटच्या पाच षटकांत 58 धावा कुटल्या होत्या. (Suryakumar Yadav Rcord)

Back to top button