Asia Cup 2022 : भारताचा आज सोपा पेपर, टीम इंडियासमोर हाँगकाँगचे आव्हान | पुढारी

Asia Cup 2022 : भारताचा आज सोपा पेपर, टीम इंडियासमोर हाँगकाँगचे आव्हान

दुबई ; वृत्तसंस्था : आशिया चषकात (Asia Cup 2022) पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर टीम इंडियासमोर आज हाँगकाँगचे आव्हान आहे. हाँगकाँगने आशिया चषकाच्या पात्रता फेरीत विजय मिळवून आपली क्षमता सिद्ध केली असली, तरी बलाढ्य भारतासमोर ते कसे खेळणार, हे पाहणे मनोरंजक असेल. टीम इंडियासाठीही हा सामना खूप महत्त्वाचा आहे; कारण यात फलंदाजांना आत्मपरीक्षण करण्याची चांगली संधी मिळणार आहे. कर्णधार रोहित शर्मालाही या सामन्यात मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे. तो धोनी, विराट कोहली आणि पाकिस्तानच्या मोईन खानलाही मागे टाकू शकतो.

टीम इंडियाने आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मध्ये आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 विकेटस् राखून पराभव केला. भारतीय संघ बुधवारी हाँगकाँग संघाशी भिडणार आहे. टीम इंडिया हा सामना जिंकून सुपर-4 साठी पात्र ठरणार आहे. यासाठी कर्णधार रोहित शर्माला कोणतीही कसर सोडायला आवडणार नाही. अशा स्थितीत खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या अनेक स्टार खेळाडूंना रोहित प्लेईंग इलेव्हनमधून बाहेरचा रस्ता दाखवू शकतो.

के. एल. राहुल आणि रोहित शर्मा भारतासाठी सलामीला येऊ शकतात. पहिल्या सामन्यात के. एल. राहुल खाते न उघडताच बाद झाला. त्याचबरोबर कर्णधार रोहित शर्माही आपल्या जुन्या लयीत दिसत नाही. तिसर्‍या क्रमांकावर सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीचे उतरणे निश्‍चित आहे. विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध चांगली सुरुवात केली होती; मात्र त्याला मोठी खेळी खेळता आली नाही. अशा स्थितीत त्याला हाँगकाँगविरुद्ध फॉर्ममध्ये यायला आवडेल.

रवींद्र जडेजाला पाकिस्तानविरुद्ध चौथ्या क्रमांकावर स्थान मिळाले. कर्णधार त्याला फलंदाजीच्या क्रमात लेफ्ट-राईट कॉम्बिनेशन करण्याची संधी चौथ्या क्रमांकावर देऊ शकतो. त्याचबरोबर सूर्यकुमार यादवच्या जागी दीपक हुडाला संधी दिली जाऊ शकते. सूर्यकुमार यादवला पाकिस्तानविरुद्ध मोठी खेळी खेळता आली नाही. दिनेश कार्तिककडे पुन्हा यष्टिरक्षकाची जबाबदारी येऊ शकते. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हिरो ठरलेल्या हार्दिक पंड्याला अष्टपैलू म्हणून संघात स्थान मिळू शकते. पाकिस्तानविरुद्ध सर्व गोलंदाजांनी शानदार खेळ दाखवला. भुवनेश्‍वर कुमारने किलर गोलंदाजी करताना चार विकेटस् घेतल्या. मात्र, आवेश खान महागात पडला. अशा परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा आवेश खानऐवजी स्टार फिरकी रविचंद्रन अश्‍विनला संधी देऊ शकतो.

भारताची संभाव्य प्लेईंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), के. एल. राहुल, विराट कोहली, रवींद्र जडेजा, दीपक हुडा, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, भुवनेश्‍वर कुमार, अर्शदीप सिंग, रविचंद्रन अश्‍विन, युझवेंद्र चहल.

Back to top button