दुबई; वृत्तसंस्था : शेवटच्या षटकापर्यंत श्वास रोखायला लावलेल्या रोमांचकारी सामन्यात भारताने पाकिस्तानचा दोन चेंडू आणि पाच गडी राखून धुव्वा उडवला. या विजयाने भारताने विश्वचषक स्पर्धेतील झालेल्या पराभवाचा बदला घेतला. रविवारच्या या लढतीत विजयाचा शिल्पकार ठरला तो अष्टपैलू हार्दिक पंड्या. त्याने फक्त 17 चेंडूंचा सामना करून 33 धावा कुटल्या आणि पाकची मधली फळी कापून काढताना तीन बळीही घेतले. पहिल्यांदा फलंदाजी करून पाकिस्तानने भारतापुढे विजयासाठी 148 धावांचे लक्ष्य ठेवले होते. रोहित शर्माच्या मावळ्यांनी ते दोन चेंडू बाकी असतानाच पूर्ण केले आणि शानदार विजयी सलामी दिली. शेवटच्या षटकांत हार्दिकने विजयी षटकार ठोकला.
भारताच्या कडक गोलंदाजीपुढे पाकिस्तानच्या फलंदाजीने नांगी टाकली. त्यांचा संपूर्ण डाव 19.5 षटकांत 147 धावांत संपला. भुवनेश्वर कुमारने 26 धावांत 4 तर हार्दिक पंड्याने 25 धावांत 3 विकेटस् घेऊन मोठी धावसंख्या उभारण्याच्या पाकिस्तानच्या स्वप्नांना सुरुंग लावला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 43 धावा केल्या.
पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. नसीमचे हे पहिले षटक भारतीयांचे ठोके वाढवणारे ठरले. डावातील दुसर्याच चेंडूवर नसीम शाहने के. एल. राहुलचा शून्यावर त्रिफळा उडवला. पुढच्या चेेंडूवर विराट कोहली आल्या आल्या बिट झाला. पुढच्या चेंडूवर फखर झमानने त्याचा झेल सोडला. तर शेवटच्या चेंडूवर रोहित शर्मा थोडक्यात बचावला. पहिल्या षटकाच्या धक्क्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी सावध फलंदाजी केली. यात रोहितचे फटक्याचे टायमिंग जमत नव्हते, परंतु विराट चांगल्या टचमध्ये दिसत होता. वेगवान गोलंदाजांनंतर फिरकी गोलंदाजही फलंदाजांना जखडू लागले. ही कोंडी फोडण्यासाठी रोहितने मोहम्मद नवाझला खणखणीत षटकार ठोकला, पण पुढच्या चेंडूवर त्याची पुनरावृत्ती करण्याचा मोह त्याला नडला आणि तो झेलबाद झाला. रोहितने 12 धावा केल्या. याच नवाझने मग विराट कोहलीलाही बाद केले. विराटने 34 चेंडूंत 35 धावा केल्या.
यानंतर रवींद्र जडेजा आणि सूर्यकुमार यांच्यावर भारतीय डावाची जबाबदारी आली. कोहलीची विकेट घेणार्या नवाझला जडेजाने पुढे सरसावत 98 मीटर लांब षटकार ठोकला. या जोडीला फोडण्यासाठी आझमने नसीम शाहला आणले. त्याने सूर्यकुमारचा (18) त्रिफळा उडवून कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवला.
शेवटच्या तीन षटकांत विजयासाठी 32 धावांची गरज होती. भारताला विजय मिळवून देण्याची जबाबदारी रवींद्र जडेजावर होती. नसीमने टाकलेल्या या षटकांत जडेजाने एक चौकार व षटकारांसह 11 धावा मिळवल्या. त्यामुळे विजयासाठी 12 चेंडूंत 21 धावा असे समीकरण आले. हरिस रौफला हार्दिक पंड्याने तीन खणखणीत चौकार ठोकले. या षटकांत 14 धावा निघाल्याने शेवटच्या षटकांत 7 धावा विजयासाठी हव्या होत्या. शेवटच्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर मोहम्मद नवाझने जडेजाचा त्रिफळा उडवला. जडेजाने 35 धावा केल्या. कार्तिकने एक धाव केली. हार्दिकने विजयी षटकार ठोकला.
तत्पूर्वी, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक टी-20 सामन्यात भारताच्या कडक गोलंदाजीपुढे पाकिस्तानच्या फलंदाजीने नांगी टाकली. त्यांचा संपूर्ण डाव 19.5 षटकांत 147 धावांत संपला. भुवनेश्वर कुमारने 26 धावांत 4 तर हार्दिक पंड्याने 25 धावांत 3 विकेटस् घेऊन मोठी धावसंख्या उभारण्याच्या पाकिस्तानच्या स्वप्नांना सुरुंग लावला. पाकिस्तानकडून मोहम्मद रिझवानने सर्वाधिक 43 धावा केल्या. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात भारत तीन वेगवान गोलंदाज घेऊन उतरला. भारतीय संघात आवेश खान, भुवनेश्वर कुमार आणि अर्शदीप सिंग हे तीन वेगवान गोलंदाज खेळले. याचबरोबर ऋषभ पंतच्या जागी अनुभवी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली.