Asia Cup 2022 : टीम इंडियाच्या सर्व सामन्यांच्या तारखा जाहीर! | पुढारी

Asia Cup 2022 : टीम इंडियाच्या सर्व सामन्यांच्या तारखा जाहीर!

पुढारी ऑनलाईन डेस्क : Asia Cup 2022 Full Schedule : आशिया कप स्पर्धेला 27 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. पहिल्या दिवशी श्रीलंका आणि अफगाणिस्तान संघ आमनेसामने येणार आहेत. पण चाहते 28 ऑगस्टला दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची वाट पाहत आहेत. दरम्यान, मोठी बातमी म्हणजे आशिया चषकाचा सहावा संघही समोर आला आहे. यापूर्वी स्पर्धेसाठी पाच संघांची नावे निश्चित झाली आहेत. ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश हे संघांचा समावेश आहे. मात्र आता क्वालिफायर सामना जिंकून सहावा संघ हा हाँगकाँगचा ठरला आहे. हा नवा संघ भारत आणि पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.

यूएई, सिंगापूर, कुवेत यांचा पराभव करून हाँगकाँगचा आशिया कपमध्ये प्रवेश

आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 28 ऑगस्टला सामना होणार आहे हे सर्वांनाच माहीत आहे, पण त्यानंतर भारतीय संघ कधी आणि कोणत्या संघासोबत मुकाबला करणार आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. 28 ऑगस्टनंतर टीम इंडियाचा सामना 31 जुलैला होणार आहे. आशिया चषक स्पर्धेचे वेळापत्रक आले, तेव्हा त्यात लिहिले होते की पात्रताफेरी संपल्यानंतर जो संघ येईल, त्या संघाशी सामना होईल. आता हा संघ निश्चित करण्यात आला आहे. साखळी टप्प्यात सर्व संघ त्यांच्या गटातील संघाविरुद्ध सामना खेळतील. म्हणजेच भारताला दोन सामने खेळायचे आहेत, पहिला पाकिस्तानशी आणि दुसरा हाँगकाँगशी. त्याचवेळी पाकिस्तान आणि हाँगकाँगलाही याच पद्धतीने खेळावे लागणार आहे. दुसऱ्या गटातील श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचे संघही प्रत्येकी दोन सामने खेळतील.

अव्वल चार संघांमध्ये ‘सुपर 4’ लढत

साखळी सामने झाल्यानंतर दोन्ही गटातील अव्वल दोन-दोन संघ ‘सुपर फोर’ मध्ये प्रवेश करतील. भारत आणि पाकिस्तान हे संघ एकाच गटातून प्रवेश करतील, हे जवळपास निश्चित आहे. पण श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या दुसऱ्या गटातून कोणते संघ अव्वल दोनमध्ये येथील हे सांगणे कठीण आहे. कारण तिन्ही संघांमध्ये एकमेकांवर मात करण्याची क्षमता आहे. म्हणजेच ‘सुपर फोर’चे सामने सुरू झाल्यावर 4 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात पुन्हा सामना होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र उर्वरित सामन्यांमध्ये टीम इंडिया कोणासोबत सामना करेल, हे आताच सांगता येणे कठीण आहे.

Back to top button