सुभाशिष संत्राचा ‘विजयी मंत्रा’; ओडिशा जुगरनटस्ची राजस्थान वॉरियर्सवर मात | पुढारी

सुभाशिष संत्राचा ‘विजयी मंत्रा’; ओडिशा जुगरनटस्ची राजस्थान वॉरियर्सवर मात

पुणे; वृत्तसंस्था : पहिल्या अल्टिमेट खो-खो स्पर्धेच्या पाचव्या दिवशी वझीर सुभाशिष संत्राच्या उल्लेखनीय कामगिरीच्या आणि उत्कृष्ट आक्रमणाच्या जोरावर ओडिशा जुगरनटस् संघाने राजस्थान वॉरियर्स संघाचा 19 गुणांच्या फरकाने पराभव करताना चमकदार विजयाची नोंद केली.

श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील सामन्यात सुभाशिष संत्राने राजस्थान वॉरियर्स संघाचे 14 खेळाडू अप्रतिमरीत्या सूर मारत टिपताना ओडिशा जुगरनटस्कडून सर्वोत्तम कामगिरी केली. नीलेश जाधव आणि आदित्य कुदळे यांनी अनुक्रमे 8 आणि 9 गुण नोंदवताना त्याला उत्कृष्ट साथ दिली. राजस्थान वॉरियर्स संघाकडून कर्णधार मझहर जमादारने 9 बळींसह एकूण 23 गुणांची नोंद करताना एकाकी झुंज दिली. ऋषीकेश मुरचावदेने 10 गुण मिळवताना त्याला साथ दिली. तरीही राजस्थान संघाला तिसर्‍या पराभवाला सामोरे जावे लागले.

त्याआधी जमादारने 3 गुण मिळवताना राजस्थानला सलामी करून दिली होती. त्याने 39 व्या सेकंदाला उत्कृष्ट डाईव्ह मारताना विशालला बाद केले. त्यामुळे ओडिशाची पहिली तुकडी 1 मिनिट 47 सेकंदात तंबूत परतली. दीपेश मोरेने 2 मिनिटे 8 सेकंद संरक्षण करताना कडवी झुंज दिली. तरीही राजस्थानने 20-02 अशी आघाडी घेतली. परंतु, सुभाशिष संत्राने तीन बळींसह 8 गुण मिळवताना ओडिशाला पहिल्या डावाअखेर 34-20 अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.

एम. के. गौतमने 3 मिनिटे 6 सेकंद संरक्षण करताना दुसर्‍या डावाच्या सुरुवातीला ओडिशाला 4 बोनस गुण मिळवून दिले. तरीही अखेरच्या डावपूर्वी ओडिशा संघ 38-44 असा पिछाडीवर होता. नीलेश जाधवच्या दोन पोल डाईव्हमुळे मिळालेली आघाडी न गमावता ओडिशा संघाने अखेर 65-46 अशा विजयाची नोंद केली. अर्जुन पारितोषिक विजेत्या सुषमा सारोळकर आणि अखिल भारतीय खो-खो महासंघाचे महासचिव एम. एस. त्यागी यांच्या हस्ते सामन्यात उत्तम कामगिरी करण्यार्‍या खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेत शनिवारी सामने होणार नाहीत. याशिवाय, रविवारी गुजरात जायंटस्विरुद्ध ओडिशा जुगरनटस् यांच्यात पहिला, तर तेलगू योद्धाज्विरुद्ध राजस्थान वॉरियर्स यांच्यात दुसरा सामना होणार आहे.

Back to top button