प्रो-कबड्डी लीगसाठी आजपासून लिलाव | पुढारी

प्रो-कबड्डी लीगसाठी आजपासून लिलाव

प्रो-कबड्डी लीगची आठवी आवृत्ती (पीकेएल 2021) वर्षाच्या विश्रांतीनंतर डिसेंबरमध्ये पुन्हा सुरू होणार आहे. नव्या सत्रासाठी खेळाडूंचा लिलाव आज, 29 ऑगस्टपासून सुरू होणार असून, तीन दिवसांचा असणार आहे.

ज्यामध्ये 450 पेक्षा जास्त खेळाडू लिलाव प्रक्रियेतून जातील. त्यामुळे अनेक संघांतील खेळाडूंची अदलाबदल तर होईलच; पण कोणत्या खेळाडूला किती बोली लागणार? याची उत्सुकता लागली आहे. गतविजेत्या बंगाल वॉरियर्सने त्यांचा कर्णधार मनिंदर सिंगसह पीकेएल 2019 च्या अंतिम फेरीत मोहम्मद इस्माईल नबीबक्ष यांना कायम ठेवले आहे.

पीकेएल 2019 मध्ये सर्वात जास्त गुण मिळवणारा पवन कुमार सेहरावत याला सलग दुसर्‍या मोसमात बेंगळुरू बुल्सने कायम ठेवले आहे, तर नवीन कुमारला दबंग दिल्ली केसीने ‘रिटेंड यंग प्लेयर्स’ श्रेणीअंतर्गत कायम ठेवले आहे.

प्रो-कबड्डी लीगने आपल्या सात हंगामात आतापर्यंत नवीन उंची गाठली आहे; कारण सहा खेळाडूंची बोली किंमत मागील दोन हंगामात एक कोटीच्या पुढे गेली आहे. या लिलावात आता मराठमोळा सिद्धार्थ देसाई हा उत्तर भारतीय खेळाडूंच्या वर्चस्वाला धक्का देत मराठी पताका फडकवू शकतो. त्याला प्रदीप नरवाल, दीपक हुडा व राहुल चौधरी यांच्याशी स्पर्धा करावी लागेल.

फजल अत्रांचली (यू मुम्बा), परवेश भैंसवाल आणि सुनील कुमार (गुजरात जायंटस्), विकास खंडोला (हरियाणा स्टीलर्स) आणि नितेश कुमार (यूपी योद्धा) यासारख्या अनुभवी खेळाडूंनाही त्यांच्या संबंधित संघाने कायम ठेवले आहे.

पुणेरी पलटणने पंकज मोहिते, संकेत सावंत, शहाजी जाधव या मराठी खेळाडूंवर विश्वास दाखवत त्यांना कायम ठेवले आहे. सर्व 12 संघ लिलावात प्रमुख खेळाडूंना आपल्या संघासाठी खरेदी करण्याचा प्रयत्न करतील; कारण त्यांनी सिझन 8 च्या मोहिमेपूर्वी 161 खेळाडूंना सोडले आहे.

पीकेएल 2021 च्या लिलावात अजय ठाकूर, परदीप नरवाल, सिद्धार्थ देसाई, राहुल चौधरी आणि नितीन तोमर यासारखे काही मोठे खेळाडू खरेदी करण्यासाठी फ्रँचायझींमध्ये तीव्र चुरस अपेक्षित आहे.

प्रो कबड्डी 2021 च्या लिलावाच्या आधी खेळाडूंना चार श्रेणींमध्ये विभागले जाईल, ज्यात वेगवेगळ्या बेस किमती असतील.

* श्रेणी अ : 30 लाख रुपये * श्रेणी ब : 20 लाख रुपये
* श्रेणी क : 10 लाख रुपये * श्रेणी ड : 6 लाख रुपये

फ्रँचायझींसाठी उपलब्ध पर्स :

प्रत्येक फ्रँचायझीकडे त्यांच्या संघांवर खर्च करण्यासाठी 4.4 कोटी रुपयांची पर्स आहे, ज्यामध्ये जास्तीत जास्त दोन खेळाडू एफबीएम (फायनल बीड मॅच) कार्ड वापरून लिलावात आपल्या खेळाडूवर अंतिम बोली झाल्यानंतरसुद्धा कायम ठेवू शकतात. अर्थात, ते किती खेळाडू आधी ठेवलेले आहेत यावर अवलंबून आहे.

पीकेएल-8 मध्ये महाराष्ट्र :

प्रो कबड्डीच्या 8 व्या हंगामाच्या लिलावासाठी 446 खेळाडूंची यादी नुकतीच जाहीर झाली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील तब्बल 50 खेळाडूंनी स्थान मिळवले आहे. यादीमध्ये हरियाणाच्या खेळाडूंचे वर्चस्व असून, जवळपास दोनशे खेळाडू एकट्या हरियाणा राज्याचे आहेत. जेव्हा लिलाव होतील त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातील खेळाडूंना बोली लावणारे खूप कमी लोक असतील; कारण संघांच्या प्रशिक्षकपदी महाराष्ट्रीयन माणसे कमी आहेत.

दीपक पाटील, एनआयएस कबड्डी प्रशिक्षक

Back to top button