Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह वर्ल्डकपलाही मुकणार? | पुढारी

Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराह वर्ल्डकपलाही मुकणार?

मुंबई, वृत्तसंस्था : भारतीय संघाला ट्वेंटी-20 वर्ल्ड कपपूर्वी मोठा धक्‍का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारताचा प्रमुख जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह हा ऑस्ट्रेलियात होणार्‍या ट्वेंटी-20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमी आहे. पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीतने आशिया चषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. 2019 मध्ये याच दुखण्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. त्याच्या या दुखापतीने पुन्हा डोके वर काढले आहे आणि त्यामुळे बीसीसीआय व निवड समितीची चिंता वाढली आहे. कारण, ट्वेंटी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी संघ जाहीर करण्यासाठी आता महिनाच उरला आहे.

पाठीच्या दुखापतीमुळे जसप्रीत बुमराह आधीही मैदानाबाहेर होता. त्याच्या गोलंदाजीच्या वेगळ्या शैलीमुळे ही दुखापत डोके वर काढत असल्याचे जाणकारांचे मत आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला अनेक महिने मैदानाबाहेर बसावे लागू शकते. असे झाले तर ट्वेंटी-20 वर्ल्डकप स्पर्धेच्या तोंडावर भारतीय संघाला हा मोठा धक्‍का असेल. 2018 मध्ये याच दुखापतीमुळे त्याचे कसोटी पदार्पण लांबणीवर पडले. आता बुमराहच्या गैरहजेरीत भुवनेश्‍वर कुमारवर संपूर्ण मदार असणार आहे.

हर्षल पटेल यालाही दुखापत झाली आहे आणि तोही वर्ल्डकप खेळण्याची शक्यता कमी आहे. जर हे दोन्ही गोलंदाज वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडले, तर भारताचा मार्ग अधिक खडतर बनेल. अशा परिस्थितीत निवड समिती मोहम्मद शमीच्या नावाचा विचार करू शकतील. निवड समितीने शमीला ट्वेंटी-20 साठी विचार करणार नसल्याचे आधी सांगितले आहे. त्याच्या वयामुळे हा निर्णय घेतला गेला आहे. पण, बुमराह व पटेलच्या गैरहजेरीत निवड समिती त्यांचा निर्णय बदलू शकतात.

होय, ही चिंतेची बाब आहे. तो आता पुनर्वसनासाठी एनसीएमध्ये आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्वोत्तम वैद्यकीय सल्ला घेणार आहोत. त्याच्या जुन्याच दुखापतीने डोके वर काढले आहे आणि हीच चिंतेची बाब आहे. वर्ल्डकप स्पर्धेसाठी आता दोन महिनेच शिल्लक आहेत आणि नको त्यावेळी त्याला दुखापतीने घेरले आहे. त्याच्या दुखापतीवर आमचं बारीक लक्ष आहे आणि त्याची दुखापत योग्य रीतीने हाताळली गेली पाहिजे, असे बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले.

Back to top button