भारतीय महिला क्रिकेट संघाच्या यशाबद्दलच्या वक्‍तव्यामुळे सौरव गांगुलीवर चाहते भडकले | पुढारी

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या यशाबद्दलच्या वक्‍तव्यामुळे सौरव गांगुलीवर चाहते भडकले

नवी दिल्लीे; वृत्तसंस्था : राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला संघाने शानदार प्रदर्शन करत रौप्यपदक पटकावले. या स्पर्धेत पहिल्यांदाच महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. पहिल्याच प्रयत्नात टीम इंडियाने रौप्यपदकाला गवसणी घातली. या ऐतिहासिक यशाने आनंदी झालेल्या चाहत्यांच्या आनंदावर बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या वक्‍तव्याने विरजण पडले. यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते गांगुली यांच्यावर नाराजी व्यक्‍त करत आहेत.

राष्ट्रकुल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून अवघ्या 9 धावांनी पराभव पत्करावा लागला. यापूर्वी 1998 मध्येही या स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. मात्र, त्यावेळी टीम इंडियाला पदक मिळाले नव्हते. यावेळी ही कसर भरून काढताना भारतीय संघाने रौप्यपदक पटकावले. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी महिला संघाचे अभिनंदन करताना लिहिले होते की, रौप्य पदक पटकावल्याबद्दल भारतीय महिला संघाचे अभिनंदन. मात्र, हे खेळाडू निराश होऊन घरी परततील. कारण आज रात्रीचा त्यांचा खेळच तसा होता. गांगुलीच्या या ट्विटवर नेटकरी मात्र जाम भडकले. एका चाहत्याने म्हटले की, शक्‍तिशाली बोर्डाचा अध्यक्ष असूनही असे संदेश पाठविणे योग्य वाटत नाही. तर दुसर्‍या एका चाहत्याने गांगुलीला थेट प्रश्‍न करताना तुम्ही किती फायनल जिंकला आहात? असे विचारले आहे.

Back to top button