क्रिकेट पंच रूडी कर्टझन यांचा अपघाती मृत्यू | पुढारी

क्रिकेट पंच रूडी कर्टझन यांचा अपघाती मृत्यू

जोहान्सबर्ग ; वृत्तसंस्था : सर्वात लोकप्रिय अम्पायर्सपैकी एक असलेले दक्षिण आफ्रिकेचे रूडी कर्टझन आणि अन्य तिघांचे कार अपघातात निधन झाले. रिव्हर्सडेल येथे हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक मीडियाने दिली आहे. 73 वर्षीय कर्टझन हे नेल्सन मंडेला बे येथील डेस्पॅच येथे राहणारे होते आणि गोल्फ खेळून ते केपटाऊन येथे घराच्या दिशेने निघाले होते. त्यांचा मुलगा रूडी कर्टझन ज्युनिअर याने वडिलांच्या निधनाची बातमी दिली. ‘ते त्यांच्या मित्रांसोबत गोल्फ स्पर्धा पूर्ण करून घराच्या दिशेने निघाले होते आणि सोमवारी ते घरी येणे अपेक्षित होते; परंतु ते आणखी एक राऊंड खेळण्यासाठी थांबले होते, असे कर्टझन ज्युनिअरने सांगितले.

कर्टझन यांनी 331 आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचगिरी केली आहे. 26 मार्च 1949 रोजी त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी दक्षिण आफ्रिकन रेल्वे संघाकडून क्रिकेट सामने खेळले होते; परंतु 1981 मध्ये त्यांनी अम्पायर बनण्याचा निर्णय घेतला. 9 डिसेंबर 1992 मध्ये त्यांनी पहिल्या वन-डे सामन्यात अम्पायरिंग केली आणि त्याच महिन्यात त्यांनी कसोटी सामन्यातही पंचगिरी केली. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील ती मॅच होती. याच सामन्यात टेलिव्हिजन रिप्लेची सुरुवात झाली होती.

Back to top button