राष्ट्रकुल महिला क्रिकेट : भारताचा आज इंग्लंडविरुद्ध उपांत्य सामना | पुढारी

राष्ट्रकुल महिला क्रिकेट : भारताचा आज इंग्लंडविरुद्ध उपांत्य सामना

बर्मिंगहॅम ; वृत्तसंस्था : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत यंदा नव्यानेच सामील करण्यात आलेल्या महिला क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघाने उपांत्य फेरी गाठली असून, त्यांचा सामना आज (शनिवारी) यजमान इंग्लंड संघाविरुद्ध होणार आहे.

भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला होता. त्यानंतर भारताने बार्बाडोसवर 100 धावांनी धडाकेबाज विजय साकारला. त्यामुळे भारताचा महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. या सामन्यात जर भारताने विजय साकारला, तर त्यांना अंतिम फेरीत स्थान मिळेल आणि त्यांचे सुवर्ण किंवा रौप्यपदक निश्चित होईल. दुसरीकडे, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांतही उपांत्य फेरी रंगणार आहे.

दोन्ही सामन्यांतील विजेते अंतिम फेरीत जातील. भारताने विजय साकारला, तर त्यांना सुवर्ण किंवा रौप्यपदक मिळू शकते; पण जर पराभव झाला तर त्यांच्याकडे कांस्यपदक जिंकण्याची संधी असेल. त्यामुळे शनिवारच्या या सामन्यात भारतीय संघ कशी कामगिरी करतो आणि तो अंतिम फेरीत पोहोचता की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

राष्ट्रकुल महिला क्रिकेट

सामन्याची वेळ : दु. 3.30 वाजता
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्टस्

Back to top button