ENGvsIND 3rd test D3 : विराटसमोरच चेतेश्वरची 'आक्रमक' खेळी | पुढारी

ENGvsIND 3rd test D3 : विराटसमोरच चेतेश्वरची 'आक्रमक' खेळी

लीड्स् : पुढारी ऑनलाईन

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात ( ENGvsIND 3rd test D3 ) रोहित शर्माने ( ५९ ) झुंजार अर्धशतक ठोकून भारताला चांगली सुरुवात करुन दिली. तो बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराने आक्रमक अर्धशतकी खेळी करत भारताला दिवस अखेर २१५ धावांपर्यंत पोहचवले. विशेष म्हणजे त्याने ही खेळी आक्रमकतेचा पुरस्कर्ता असलेल्या विराट कोहलीच्या समोरच साकारली. विराटही त्याला चांगली साथ देत आहे.

या दोघांनी दिवस अखेर भारताला ८० षटकात २ बाद २१५ धावांपर्यंत पोहचवले. भारत अजून १३९ धावांनी पिछाडीवर आहे. चेतेश्वर पुजारा ९१ धावा करुन नाबाद आहे तर विराट कोहलीही ( ४५ ) आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला आहे.

पहिल्या सत्रात भारताची पहिली विकेट ( ENGvsIND 3rd test D3  )

भारत आणि इंग्लंड याच्यातील तिसऱ्या कसोटीत ( ENGvsIND 3rd test D3  ) इंग्लंडचा पहिला डाव ४३२ धावांवर संपला. इंग्लंडने पहिल्या डावात ३५४ धावांची मोठी आघाडी घेतली. त्यानंतर भारताने आपला दुसरा डाव सुरु केला. सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल सावध फलंदाजी करतो होते. मात्र लंचला काही मिनिटे शिल्लक असतानाच केएल राहुल ८ धावा करुन बाद झाला.

तत्पूर्वी, तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात कालच्या ८ बाद ४२३ धावांपासून पुढे खेळताना इंग्लंडच्या तळातील फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. मोहम्मद शमीने क्रेग ओव्हरटर्नची खेळी ३२ धावांवर संपवली. त्यानंतर बुमराहने ओली रॉबिन्सनचा शुन्यावर त्रिफळा उडवत इंग्लंडचा डाव ४३२ धावांवर संपवला. याचबरोबर इंग्लंडने पहिल्या डावात ३५४ धावांची घसघशीत आघाडी घेतली.

भारताकडून मोहम्मद शमीने चांगला मारा करत ९५ धावात ४ बळी टिपले तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या. भारतीय संघातील सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला या कसोटीत फारशी चमक दाखवता आली नाही. त्याने २२ षटके टाकत ९२ धावा दिल्या मात्र त्याला एकही विकेट घेता आली नाही.

इंग्लंडकडून पहिल्या डावात कर्णधार जो रुटने १२१ धावांची दमदार शतकी खेळी केली. त्याला डेव्हिड मलानने ७० धावा करुन चांगली साथ दिली. याचबरोबर हासीब हमीद ( ६८ ) आणि रोरी बर्न्स  ( ६१ ) यांनीही अर्धशतकी खेळी केली.

दुसरे सत्र रोहितच्या नावे

लंचपूर्वी बाद झालेल्या केएल राहुलनंतर खेळपट्टीवर चेतेश्वर पुजारा फलंदाजीसाठी आला. त्याने आणि रोहित शर्माने मिळून भारताचे अर्धशतक धावफलकावर लावले. त्यानंतर सावध फलंदाजी करणाऱ्या रोहितने आपले अर्धशतक पूर्ण केले. याचबरोबर या जोडीने संघाचे शतकही धावफलकावर लावले.

या दोघांनी दुसऱ्या सत्रात इंग्लंडला एकही यश मिळू न देता ७८ धावांची झुंजार भागीदारी केली. चहापानासाठी खेळ थांबला त्यावेळी रोहित ५९ तर पुजारा ४० धावा करुन नाबाद होते.

तिसऱ्या सत्रात चेतेश्वर आक्रमक झाला

चहापानानंतर पुन्हा मैदानात आलेली रोहित आणि पुजाराची मोठी भागीदारी रचणार असे वाटत होते. मात्र रॉबिन्सनचा एक आत येणारा चेंडू रोहित शर्माच्या पॅडवर आदळला आणि जोरदार अपील झाली. पंचांनी त्याला बाद ठरवले. रोहितनेही पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले. मात्र चेंडू विकेटला घासून जात असल्याचे दाखवत अंपायर्स कॉल म्हणत रोहितला बाद ठरवण्यात आले.

रोहित बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या साथीला आलेल्या कोहलीला घेत संघाला १५० च्या पार पोहचवले. पुजाराने आक्रमक खेळी करत भारताचा धावफलकही चांगला हलता ठेवला. या दोघांनी भारताला दिवस अखेर २१५ धावांपर्यंत पोहचवले. दोघांनीही तिसऱ्या विकेटसाठी नाबाद ९९ धावांची भागिदारी रचली.

भारत अजून १३९ धावांनी पिछाडीवर आहे. चेतेश्वर पुजारा ९१ धावा करुन नाबाद आहे तर विराट कोहलीही ( ४५ ) आपल्या अर्धशतकाजवळ पोहचला आहे.

Back to top button