

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या महिला हॉकीच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली. 'करो वा मरो' अशी स्थिती असलेल्या या सामन्यात भारतीय महिलांनी कॅनडाचा 3-2 असा पराभव करत अंतिम चार संघांतील स्थान निश्चित केले. सेमीफायनलमध्ये शुक्रवारी भारतीय महिलांची गाठ बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध पडणार आहे.
सामन्याच्या तिसर्याच मिनिटात सलिमा टेटेने पेनल्टी कॉर्नरवर गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसर्या क्वार्टरमध्ये नवनीतने गोल करून भारताची आघाडी 2-0 अशी भक्कम केली. स्टेअर्सने गोल करून आघाडी 2-1 ने कमी केली. तिसर्या क्वार्टरमध्ये हन्ना ह्यूनने करत कॅनडाला 2-2 अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर चौथ्या क्वार्टरमध्ये लालरेसमियामीने पेनल्टीवर शानदार गोल नोंदविला. भारताने अखेरपर्यंत 3-2 अशी आघाडी कायम राखत विजयसह सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
भारताची महिला ज्युदो खेळाडू तुलिना मानने फायनलमध्ये प्रवेश करत पदक निश्चित केले. तिने महिलांच्या 78 किलोवरील गटात अंतिम फेरीत प्रवेश केला. सेमीफायनलमध्ये तुलिकाने ऑस्ट्रेलियाच्या सिडनी अँड्र्यूज हिचा 10-1 अशा एकतर्फी धुव्वा उडविला. तुलिकाने उपांत्यपूर्व फेरीतही मॉरिशसच्या डरहोनचा एकतर्फी पराभव केला होता. तुलिकाचा फॉर्म पाहता तिचे स्पर्धेतील सुवर्णपदक निश्चित असल्याचे मानले जात आहे.