ग्रँडमास्टर गोकेशचा मास्टर स्ट्रोक | पुढारी

ग्रँडमास्टर गोकेशचा मास्टर स्ट्रोक

मामल्‍लापूरम; वृत्तसंस्था :  चेन्‍नई जवळच्या मामल्‍लापूरम येथे सुरू असलेल्या 44 व्या बुद्धिबळ ऑलियाडमध्ये युवा ग्रँडमास्टर डी गोकेशने माजी विश्‍वविजेत्या अ‍ॅलेक्सी शिरोव्ह याचा धक्‍कादायक पराभव केल्यामुळे पाचव्या फेरीत भारताने स्पेनवर 2.5-1.5 असा विजय मिळवला.

गोकेशने भारताच्या ‘ब’ संघाकडून खेळताना आपली स्पर्धेतील अपराजित वाटचाल पाचव्या फेरीतही पुढे सुरू ठेवली. त्याच्या विजयाने चतुर्थ मानांकित स्पेनवर भारताला मात करता आली. गोकेशचा हा पाचवा विजय ठरला. या विजयामुळे तो आता गुणांकनात विदीत गुजरातीच्या पुढे गेला आहे.

शिरोव्हसारख्या खेळाडूला हरवणे निश्‍चितच आनंददायी आहे. त्याने एक छोटी चूक केली आणि मी त्याचा फायदा उठवत त्याला खेळातून बाहेर केले, अशी प्रतिक्रिया गोकेशने विजयानंतर दिली.

दरम्यान, पुरुष गटातील भारत ‘अ’ आणि भारत ‘क’ संघाने अनुक्रमे रोमानिया आणि क्रोएशिया संघावर विजय मिळवला. तर महिलांच्या ‘अ’ संघाला तानिया सचदेवने पुन्हा एकदा तारले. तिने मिळवलेल्या विजयामुळे संघाने फ्रान्सला 2.5-1.5 असे हरवले. तिच्या अगोदर कोनेरू हम्पी, हरिका द्रोणावल्‍ली आणि आर. वैशाली यांनी आपले सामने बरोबरीत सोडवले होते.

Back to top button