वेटलिफ्टिंग : विकासला ‘रौप्य’; हरजितला ‘कांस्य’ | पुढारी

वेटलिफ्टिंग : विकासला ‘रौप्य’; हरजितला ‘कांस्य’

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टर्सनी आपली विजयी कामगिरी सुरूच ठेवली असून, मंगळवारी यात ‘रौप्य’ आणि ‘कांस्य’ची भर पडली. स्पर्धेच्या पुरुष 96 किलो वजनी गट वेटलिफ्टिंगमध्ये भारताच्या विकास ठाकूरने रौप्यपदकाची कमाई केली आहे. त्याने एकूण 346 किलो वजन उचलत भारताला रौप्यपदक पटकावून दिले.

वेटलिफ्टिंगमधून भारताला हे तिसरे ‘रौप्य’, तर एकूण आठवे पदक मिळाले आहे. तत्पूर्वी, महिलांच्या 71 किलो वजनी गटात हरजित कौरने कांस्यपदक मिळवले होते. कौरने एकूण 212 किलो वजन उचलले.

कांस्यपदक लढतीत तिसर्‍या क्रमांकावरील नायजेरियाच्या 18 वर्षीय जॉय ऐजे हिला तिन्ही प्रयत्नांत अपयश आले. त्यामुळे चौथ्या क्रमांकावरील हरजितच्या गळ्यात अनपेक्षितपणे कांस्यपदक आले. हरजितने शेवटच्या फेरीत 113 किलो, 116 किलो आणि 119 किलो असे वजन वाढवत नेले; पण जॉयने सुवर्णपदकासाठी थेट 125 किलोचे वजन उचलण्याचा निर्धार केला आणि ती अपयशी ठरली.

Back to top button