वेटलिफ्टिंगमध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक | पुढारी

वेटलिफ्टिंगमध्ये भारताला आणखी एक सुवर्णपदक

बर्मिंगहॅम; वृत्तसंस्था : युवा वेटलिफ्टिंगपटू अचिंत शुलीने रविवारी रात्री उशिरा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विक्रमी कामगिरी करत भारतासाठी तिसर्‍या सुवर्णपदकाची कमाई केली. 20 वर्षीय अंचितने 73 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पश्चिम बंगालच्या या खेळाडूने 143 किलो वजन उचलले.

हा या स्पर्धेतील नवीन विक्रम ठरला आहे. शुलीच्या आधी युवा वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालरिन्नुगाने पुरुषांच्या 67 किलो वजनी गटात स्नॅचमध्ये 140 किलो आणि क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये 160 किलो असे एकूण 300 किलो वजन उचलत अग्रस्थान मिळवले.

स्पर्धेतील विक्रम

शुलीने स्नॅच प्रकारामध्ये 143 किलो वजन उचलले. हा या स्पर्धेतील विक्रम आहे. तर शुलीनेच क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये 170 किलोसहीत एकूण 313 किलो वजन उचलत या स्पर्धेमधील नवीन विक्रम आपल्या नावे करून घेतला. मागील वर्षी जागतिक स्तरावरील ज्युनिअर चॅम्पियनशिपमध्ये शुलीने रौप्य पदकाची कमाई केली होती.

तिसर्‍या प्रयत्नात सर्वोत्कृष्ट कामगिरी

शुलीने आपल्या तिसर्‍या संधीमध्ये राष्ट्रकुलमध्ये पदक मिळवून देणारे दोन्ही लिफ्ट केले. मलेशियाच्या ई हिदायत मोहम्मदला या स्पर्धेत रौप्य तर कॅनडाच्या शाद डारसिग्रीला कांस्य पदक मिळाले. मलेशियाच्या खेळाडूने 303 किलो तर कॅनडाच्या खेळाडूने 298 किलो वजन उचलले.

Back to top button