राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2022 : राष्ट्रकुलचा आजपासून थरार

बर्मिंगहॅम : वृत्तसंस्था : इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे 28 जुलै ते 8 ऑगस्ट यादरम्यान 22 वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा रंगणार आहे. 72 देशांतील सुमारे साडेचार हजारांहून अधिक खेळाडू आपापल्या देशासाठी पदक जिंकून देण्यासाठी मैदानात आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. भारताचा 215 सदस्यांचा संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहे. यावेळी भारतीय चमू यापूर्वीपेक्षाही जास्त पदक जिंकण्यास सज्ज झाला आहे. भारताचा स्टार अॅथलिट व भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे. तर ऐश्वर्या स्पर्धेसाठी रवाना होण्यापूर्वी डोप टेस्ट चाचणीत दोषी आढळली आहे. यामुळे 213 खेळाडू भारताला पदके मिळवून देण्याचा प्रयत्न करतील.
राष्ट्रकुल 2022 मध्ये एकूण 72 देश सहभागी झाले आहेत. या देशांचे सुमारे साडेचार हजारांहून अधिक खेळाडू पदकासाठी आपले कौशल्य पणास लावणार आहेेत. उल्लेखनीय म्हणजे सुमारे 24 वर्षांच्या कालखंडानंतर राष्ट्रकुल स्पर्धेत महिला क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे यंदा महिला क्रिकेटर सुवर्णपदकासाठी धावाधाव करताना दिसणार आहेत.
दर चार वर्षांनी आयोजन
राष्ट्रकुल स्पर्धा प्रत्येक चार वषार्र्ंनी आयोजित केल्या जातात. ऑलिम्पिक आणि आशियाई स्पर्धेनंतर राष्ट्रकुलला तिसरी मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. पहिली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 1930 साली कॅनडामधील हॅमिल्टन या शहरात आयोजित करण्यात आली होती. 1934 साली भारताने प्रथमच या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यावेळी या स्पर्धेस ब्रिटिश एम्पायर गेम्स म्हणून ओळखले जात आहे.
स्पर्धेचे भव्य उद्घाटन होणार
22 व्या राष्ट्रकुलचे यजमानपद मिळालेल्या बर्मिंगहॅममध्ये या स्पर्धेचे भव्य उद्घाटन करण्यात येणार आहे. या सोहळ्यात ब्रिटिश संस्कृती व आधुनिकतेचे दर्शन घडणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वा. उद्घाटन सोहळ्यास सुरुवात होईल.
क्रिकेट महिला :
29 जुुलै : भारत वि. ऑस्ट्रेलिया
31 जुुलै : भारत वि. पाकिस्तान
3 ऑगस्ट : भारत वि. बार्बाडोस
हॉकी पुरुष :
31 जुुलै : भारत वि. घाना
1 जुुलै : भारत वि. इंग्लंड
3 ऑगस्ट : भारत वि. कॅनडा
4 ऑगस्ट : भारत वि. वेल्स
हॉकी महिला :
29 जुुलै : भारत वि. घाना
30 जुुलै : भारत वि. वेल्स
2 ऑगस्ट : भारत वि. इंग्लंड
3 ऑगस्ट : भारत वि. कनडा
उद्घाटन समारंभ
गुरुवार : 28 जुलै 2022
स्थळ : बर्मिंगहॅम, इंग्लंड
वेळ : रात्री 11.30 पासून
प्रक्षेपण : सोनी स्पोर्टस् नेटवर्क
आमच्यासाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा अत्यंत महत्त्वाची आहे. पदक जिंकण्याचे टार्गेट नजरेसमोर ठेवून आम्ही मैदानात उतरणार आहे. या स्पर्धा पाहत आम्ही मोठे झालो आहोत. अशा स्थितीत या स्पर्धेत खेळण्याची आम्हाला संधी मिळत आहे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आम्ही पदक मिळविण्याचा प्रयत्न करू.
– हरमनप्रीत कौर
कर्णधार, भारतीय महिला क्रिकेट संघ