भालाफेकपटू नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर | पुढारी

भालाफेकपटू नीरज चोप्रा राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर

नवी दिल्ली ; वृत्तसंस्था : भारताचा तारांकित भालाफेकपटू नीरज चोप्राला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळे तो बर्मिंगहॅम येथे होणार्‍या आगामी राष्ट्रकुल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुखापत झाल्याने तो या स्पर्धेत खेळू शकणार नसल्याची माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने एक निवेदन जारी करत दिली आहे. रविवारी ओरेगॉन येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने 88.13 मीटर अंतरावर भालाफेक करून रौप्यपदक जिंकले होते. या स्पर्धेतील कामगिरीदरम्यान त्याला दुखापत झाल्याने तो राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्यामुळे भारताचे निश्चित समजले जाणारे एक पदक कमी होणार आहे.

याबाबत अधिक माहिती देताना आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी सांगितले की, भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने आज सकाळी मला अमेरिकेतून फोन केला होता. दुखापत झाल्याने आपण बर्मिंगहॅम येथे होणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धेत खेळू शकणार नाही, अशी माहिती त्याने दिली. रविवारी पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग घेतल्यानंतर नीरज चोप्रा याचे सोमवारी एमआरआय स्कॅन करण्यात आले. त्या आधारावर डॉक्टरांनी त्याला एक महिन्याच्या विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

गेल्यावर्षी टोकिओ येथे पार पडलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत नीरजने ‘सुवर्ण’ कामगिरी केली होती. त्यानंतर रविवारी ओरेगॉन येथे पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत नीरजने रौप्यपदक (सिल्व्हर मेडल) जिंकले होते. अंतिम फेरीत भालाफेक करताना चौथ्या प्रयत्नानंतर नीरजने मांडीत दुखापत जाणवत असल्याची तक्रार केली होती. सोमवारी एमआरआय केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

Back to top button