कुस्तीगीर परिषदेत भाजपची शरद पवारांना ‘धोबीपछाड’ | पुढारी

कुस्तीगीर परिषदेत भाजपची शरद पवारांना ‘धोबीपछाड’

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : काही दिवसांपूर्वी शरद पवार हे अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्यात आली होती. भारतीय कुस्ती संघटनेच्या नवी दिल्ली येथे झालेल्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीत हा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता यासाठी निवडणुका होणार असून भाजपचे वर्धा येथील खासदार रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने न्यायालयीन प्रक्रिया पार पडल्यानंतरच याबाबत अधिकृत घोषणा होणार आहे.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या निवडणुका 31 जुलै रोजी पार पडत असून अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तीन जणांनी अर्ज केले होते. त्यापैकी दोघांनी अर्ज मागे घेतल्यामुळे ही निवडणूक बिनविरोध पार पडणार आहे. काकासाहेब पवार आणि धवलसिंग मोहिते-पाटील यांनी आपले अर्ज मागे घेतले असून रामदास तडस यांची बिनविरोध निवड होणार आहे. काकासाहेब पवार सचिव असतील. तडस हे सध्या भाजपमध्ये असले तरी पूर्वी ते राष्ट्रवादीमध्ये होते. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्षपद रामदास तडस यांनी भूषवले आहे. तडस हे स्वतः चार वेळा विदर्भ केसरी राहिले आहेत.

याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून कोणत्याही स्पर्धेचे आयोजन करण्यात येत नसल्यामुळे बरखास्त करण्यात आल्याचे भारतीय कुस्ती संघटनेचे सहायक सचिव विनोद तोमर यांनी सांगितले होते.

कोण आहेत रामदास तडस?

मूळचे राष्ट्रवादीचे असलेले रामदास तडस हे वर्धा लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर सलग दुसर्‍यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. 2014 मध्ये दोन लाखांहून जास्त मताधिक्य मिळवत काँग्रेस उमेदवार सागर मेघे यांचा त्यांनी पराभव केला होता. 2019 मध्ये त्यांनी आपली जागा राखण्यात यश मिळवले. याआधी रामदास तडस राष्ट्रवादीत होते. वर्धा चंद्रपूर गडचिरोली विधान परिषदेतून तडस दोन वेळा आमदार झाले आहेत. देवळी नगर परिषदेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे; तर राष्ट्रवादीकडून त्यांना एसटी महामंडळाचे संचालकपदही देण्यात आले होते. त्यामुळे ‘घड्याळ’ सोडून भाजपत गेलेला खासदारच शरद पवारांची जागा घेणार असल्याचे निश्चित झाले.

महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. मंगळवारी अर्ज माघारीचा दिवस होता. त्यामध्ये अध्यक्ष आणि सरचिटणीस पदाच्या एका जागेसाठी सध्या एकच अर्ज असून इतर पदांबाबतही अशीच परिस्थिती आहे. परंतु, ही न्यायालयीन प्रक्रिया असल्याने अधिकृत घोषणा करता येणार नाही. 28 जुलै रोजी न्यायालयामध्ये याबाबतच्या याचिकेवरील सुनावणी असून तिथेच अधिकृत घोषणा होईल.
– अशोक एस शिवाणकर (निवडणूक निर्णय अधिकारी)

Back to top button